जालना : जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपकडून विद्यमान आमदार बबनराव लोणीकर सलग आठव्यादा उमेदवारी जाहीर झाली आहे. १९९० पासूनच्या विधानसभा निवडणुकांत आतापर्यंत तेच भाजपचे उमेदवार राहिलेले असून, चार वेळेस ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याची उत्सुकता आहे.

३५ वर्षांपूर्वी १९९० मध्ये लोणीकर यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु काँग्रेस उमेदवार कै. वैजनाथराव आकात यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. परंतु विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात पराभव झाला तरी मिळालेल्या जवळपास २८ हजार मतांमुळे त्यांचा आत्मविश्वास मात्र वाढला होता. पुढच्याच १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अब्दुल कदीर देशमुख यांच्याशी त्यांनी अटीतटीची लढत दिली. परंतु केवळ २२२ मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर मात्र, १९९९, २००४, २०१४ आणि २०१९ या चार निवडणुकांत त्यांचा विजय झाला. या चार निवडणुकांत त्यांनी वैजनाथराव आकात, अब्दुल कदीर देशमुख, बाबासाहेब आकात, या दिवंगत नेत्यांसह सुरेशकुमार जेथलिया याांच्यासारख्या स्थानिक महत्त्वाच्या नेत्यांचा पराभव केला.

हेही वाचा : नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?

जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि लोणीकर यांच्यात फारसे सख्य नाही हे सर्वविदीत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षातील प्रमुख पुढाऱ्यांशीही त्यांचे अनेकदा खटके उडालेले आहेत. जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यातील भाजपवर त्यांची पकड पस्तीस वर्षांपासून आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर म्हणजेच भाजप हे समीकरण या भागात झालेले आहे. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राहुल लोणीकर यांचे स्थान परतूर आणि मंठा तालुक्यातील भाजपमध्ये आहे. २००९ पासूनच्या तीन विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया हे लोणीकर यांचे प्रतिस्पर्धी होते. आता सलग चौथ्या वेळेसही तेच लोणीकर यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये जेथलिया यांनी अपक्ष निवडणूक लढवून लोणीकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र, लोणीकर विजयी होत आले आहेत.