राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राशेजारील राज्यामध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे जागा लढवणार असला तरी, मराठी भाषकांच्या हिताला महत्त्व दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे पवार म्हणाले. कर्नाटकमध्ये २२४ मतदारसंघ असून काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करेल. मात्र, सीमाभागांतील मराठी भाषकांसाठी एकमेकांमध्ये मतभेद झालेले योग्य ठरणार नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देऊ, असेही पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – जालन्याच्या सत्तेसाठी भाजपचा आटापिटा

काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळला होता. बेळगाव आदी सीमाभागांमध्ये हिंसक घटनाही झाल्या होत्या. तिथल्या मराठी भाषकांमध्ये अन्याय होत असल्याची भावना असून यावेळी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत मराठी भाषकांचा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नुकसान न होण्याची दक्षता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपले उमेदवार उभे करावे लागणार आहेत.

कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच-सात उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे भाजपचा फायदा होण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकमध्ये निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. शिवाय, केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा काढून घेतल्यामुळे पक्षाला अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. महाराष्ट्र व नागालँड या दोन राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता टिकून राहिलेली आहे. लोकसभेत किमान चार खासदार व लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत चार राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळवणाऱ्या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्षा’चा दर्जा दिला जातो. त्यामुळे हे निकष पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.

हेही वाचा – काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांमुळे ओबीसी जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

हितसंबंधातील विसंगती

कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) अशी तिहेरी लढत होणार आहे. सत्ताधारी भाजपच्या घोटाळ्यांमुळे काँग्रेसला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत आहेत. पण, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या ऐक्यात सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकमध्ये निवडणूक लढवेल. त्यामुळे काही जागांवर काँग्रेस आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारही रिंगणात असेल. त्यानिमित्ताने राज्या-राज्यांतील विरोधी पक्षांच्या हितसंबंधातील विसंगती समोर आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party expansion of ncp by contesting elections in karnataka print politics news ssb