राज्यातील महाविकास आघाडीतील जागावाटप व मुख्यमंत्रीपदावरून तीव्र झालेल्या वादात काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रादेशिक नेत्यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी रात्री दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले असून विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व प्रभारी रमेश चन्निथाला यांनाही दिल्लीला चर्चेसाठी पाचारण केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अतिआत्मविश्वास आणि वादग्रस्त विधानांमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होत असल्याचा गैरसमज निर्माण होईल. नाहक वाद निर्माण करण्यापेक्षा जमिनीवर पाय ठेवून काम करा. उमेदवारांची निवड करताना अन्य जातींवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, असा सल्ला खरगेंनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्याचे समजते. ‘महाविकास आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती असली तरी आपलेच सरकार सत्तेत येणार, आता फक्त मुख्यमंत्री कोणाचा, हेच ठरायचे बाकी आहे असा समज घटक पक्षांतील नेत्यांनी करून घेतला आहे. नेत्यांमधील हा अतिआत्मविश्वास घात करू शकेल’, असे मत काँग्रेस कार्यकारिणीतील एका सदस्याने व्यक्त केले.
हेही वाचा >>>माथाडी राजकारणाला शिंदे सेनेची बगल ? मराठा बहुल मेळाव्यावर भाजपचा प्रभाव
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असून स्ट्राइक रेटही जास्त आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपामध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या पाहिजेत, असे विधान काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी केले होते. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी, ‘काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल’, असा दावा केला होता. या विधानांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे समर्थन केले होते. काँग्रेस नेत्यांच्या विधानांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, मोठा भाऊ आणि छोटा भाऊ कोण हे विधानसभा निवडणुकीत दिसेलच, असे ठणकावले. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेमुळे काँग्रेसला अधिक जागा मिळाल्याचा दावाही राऊत यांनी केला.
काँग्रेस नेते व शिवसेनेच्या ठाकरे गटातील वाद चिघळू लागल्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ‘मध्यस्थी’ केल्याचे समजते. राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने योग्य पावले टाकली असली तरी बदलापूर एन्काऊंटर आदी वादग्रस्त मुद्द्यांबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी मतप्रदर्शन करताना दक्षता घेतली पाहिजे, असे मत कार्यकारिणी सदस्याने व्यक्त केले.
हेही वाचा >>>Tripura : त्रिपुरा दहशतवादमुक्त? ‘एनएलएफटी’ आणि ‘एटीटीएफ’ बंडखोर गटाच्या ६०० सदस्यांचं आत्मसमर्पण
‘न्यायपत्रा’च्या आधारे जाहीरनामा!
महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर टिप्पणी करताना पक्षाध्यक्ष खरगे यांनी, ‘आमचे सरकार महिलांना दरमहा २ हजार रुपये देईल’, असे आश्वासन दिले होते. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीतील ‘न्यायपत्रा’च्या धर्तीवर विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार केला जात असून त्यामध्ये खरगेंच्या आश्वासनाचाही समावेश केला जाणार असल्याचे समजते. ‘न्यायपत्रा’मध्ये शेतकऱ्यांना कर्जामाफी, महिला व बेरोजगारांना भत्ता, पिकांना कायदेशीर हमी, २५ लाखांचा आरोग्यविमा आदी मुद्द्यांचा समावेश करण्यात आला होता.
काँग्रेसठाकरे गट ११०१००?
मुंबईमध्ये पुढील चार-पाच दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठक होणार आहे. काँग्रेसने १२० पेक्षा जास्त जागांची मागणी केली असली तरी काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटाला प्रत्येकी सुमारे १००-११० तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुमारे ८० जागांचे वाटप केले जाऊ शकेल. उर्वरित ८-१० जागा इतरांना दिल्या जातील असे सूत्रांचे म्हणणे आहे. जागावाटपांसंदर्भातही खरगे व नाना पटोले यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजते.