गुजरातमधील पाटीदार आंदोलन समितीतील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी आप आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पाटीदार आंदोलन समितीचे प्रमुख अल्पेश कथेरिया आणि धार्मिक मालवीय यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ‘आप’मध्ये प्रवेश केला. अल्पेश कथेरिया आणि धार्मिक मालवीय या दोघांचाही २०१५ मध्ये झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनात सक्रीय सहभाग होता. दरम्यान, दोघांनाही आगामी गुजरात निवडणुकीत ‘आप’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार?
व्यवसायाने वकील असलेले कथेरिया महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. २०१५ मध्ये पाटीदार आंदोलनानिमित्ताने ते हार्दिक पटेल यांच्या संपर्कात आले. दोघांनीही पाटीदार आंदोलनात एकत्र काम केले. पुढे त्यांनी पाटीदार आंदोलन समितीही स्थापन केली. २०१७ मध्ये सुरतमध्ये झालेल्या पाटीदार आंदोलनानंतर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी हिंचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी पाटीदार आंदोलनातील अनेक नेत्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. कथेरिया यांच्यावर राजद्रोहासह ३०, तर मालवीय यांच्याविरोधात २२ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. हार्दीक पटेल यांनी २०२० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पाटीदार आंदोलन समितीपासून स्वत:ला दूर केले. त्यानंतर अल्पेश कथेरिया आणि धार्मिक मालवीय यांनी या समितीचे काम पुढे नेले.
हेही वाचा – ‘आंतरराष्ट्रीय नेते’ म्हणत टीआरएसने उडवली राहुल गांधींची खिल्ली; म्हणाले, “भावी पंतप्रधानांनी अमेठीतून…”
‘आप’ प्रवेशाबाबत बोलताना मालवीय यांनी, ”पाटीदार आंदोलनादरम्यान आमच्या अनेक सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. हे गुन्हे रद्द करण्याची मागणी आम्ही केली होती. हार्दीक पटेल यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर दोन महिन्यात हे गुन्हे रद्द करू, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यावर अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. याउलट हार्दीक पटेल यांनाच राजकारणातून बाजुला करण्यात आलं, त्यामुळे आम्ही ‘आप’मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, भाजपाला २०१५ साली झालेल्या पाटीदार आंदोलनाचा फटका २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसला होता. त्यामुळे अल्पेश कथेरिया आणि धार्मिक मालवीय यांच्या ‘आप’ प्रवेशानंतर त्यांच्या विरोधात भाजपाकडून हार्दीक पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.