मुंबई : राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी फेब्रुवारी अखेर होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजपचे तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निवृत्त होत असले तरी पक्षातील फुटीमुळे या दोन्ही पक्षांना जागा मिळणार नाही.
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे तीन, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. हे संख्याबळ कायम राहणार असले तरी फाटाफुटीमुळे शिवसेना शिंदे गट तर राष्ट्रवादीतील अजित पवार गटाला प्रत्येकी जागा मिळेल. याचाच अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील शरद पवार गटाला आपापली जागा कायम राखता येणार नाही.
दोन वर्षांपूर्वी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतच एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. यंदा निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. २०२२ मध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटल्याने पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. भाजपकडे पुरेशी मते नसतानाही धनंजय महाडिक हे निवडून आले होते. राज्यसभा निवडणुकीच्या वेळीच महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यसभेनंतर दहाच दिवसांनी झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले होते.
यंदा राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. भाजपचे गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. भाजपचे १०४ आमदार असले तरी १३ अपक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपला तीन जागा सहजपणे मिळू शकतात. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ४० पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून, अपक्ष व छोट्या पक्षांचे १० जण बरोबर आहेत. या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येईल. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा सहजपणे मिळू शकते. उद्धव ठाकरे गटाकडे १५ तर शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा केला तरी ४१ हा जादुई आकडा गाठणे सद्यस्थितीत कठीण दिसते. यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला राज्यसभेतील आपापल्या जागा गमवाव्या लागणार आहेत.
उमेदवारी कोणाला ?
भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन जण निवृत्त होत आहेत. यापैकी राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लढायचे नसल्यास पुन्हा राज्यसभेची संधी मिळू शकते. प्रकाश जावडेकर यांना पुन्हा खासदारकी मिळण्याची शक्यता नसल्याचे पक्षात बोलले जाते. मुरलीधरन यांच्याबाबतचा निर्णय दिल्लीतच होईल. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसमध्ये कुमार केतकर हे निवृत्त होत आहेत. राज्यसभेसाठी अनेक इच्छूक असले तरी पक्षाध्यक्ष खरगे हेच निर्णय घेतील. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात येते.
मतदान झाल्यास शिवसेनेत पक्षादेशाचा मुद्दा
राज्यसभेची निवडणूक शक्यतो बिनविरोधच होण्याची चिन्हे आहेत. महायुतीला सहापैकी पाच जागा मिळणार असून, एक जागा काँग्रेसला मिळेल. खुल्या पद्धतीने मतदान असल्याने मतांची फोडाफोड करण्याची शक्यता नसते. तरीही मतदान झालेच तर आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या १५ आमदारांना कोणता पक्षादेश लागू होईल, याचा कायदेशीर मुद्दा येऊ शकतो. कारण विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांचा पक्षादेश पाळावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. मतदान खुल्या पद्धतीने असल्याने ठाकरे गटाला पक्षादेशाच्या विरोधात मतदान करता येणार नाही.
निवृत्त होणारे खासदार : नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार गट)
मतांचा कोटा कसा निश्चित होतो ?
सहा जागांसाठी मतदान असल्याने २८७ (एक जागा रिक्त) भागीले सात = ४१ अधिक .१ म्हणजे कोटा ४१.०१