अभिनेते आणि राजकीय नेते, जन सेना पक्षाचे (JSP) प्रमुख के. पवन कल्याण यांनी आगामी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पहिल्यांदाच त्यांचा पक्ष तेलंगणातील विधानसभा निवडणूक लढवित आहेत. हैदराबाद शहराच्या आसपासचे मतदारसंघ, तसेच खम्मम आणि नालगोंडा जिल्ह्यातील काही मंतदारसंघ अशा एकूण ३२ ठिकाणी जेएसपी पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. मुळचा आंध्र प्रदेशमधील असलेल्या जन सेना पक्षाने तेलंगणामध्ये कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. सध्या आंध्र प्रदेश राज्यापुरते भाजपाशी संधान बांधण्यात आले आहे. मध्यंतरी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना अटक झाल्यानंतर पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षासोबत निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेलगू देसम पक्षानेही (TDP) अलीकडेच तेलंगणामधील विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती, तसेच खम्मम येथे जाहीर सभाही आयोजित केली होती. मात्र, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू त्यानंतर कायदेशीर अडचणीत सापडले असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे तेलंगणासाठी पक्षाने आखलेल्या योजनेवर संभ्रम निर्माण झालेला आहे. २०१९ साली जेएसपीने तेलंगणातील पाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना एकाही ठिकाणी विजय मिळू शकला नव्हता.

हे वाचा >> पवन कल्याण सातत्याने चर्चेत का असतात?

आंध्र प्रदेशचा शेजारी असलेल्या या राज्यात पवन कल्याण यांचा मोठा चाहता वर्ग असला तरी जेएसपीचे संघटन फारसे मजबूत नाही. जेएसपीचे उपाध्यक्ष बी. महेंदर रेड्डी म्हणाले, “जेएसपी आणि पवन कल्याण यांना माननारा वर्ग ज्याठिकाणी आहे, त्याठिकाणी आम्ही निवडणूक लढविणार आहोत. युवकांना आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. निवडणूक लढवित असलेल्या काही मतदारसंघात पवन कल्याण स्वतः प्रचारासाठी उतरणार आहेत”

मुळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मतदारांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न जेएसपीकडून केला जाणार आहे. त्यातही हैदराबादमधील कुकटपल्ली, उप्पल, एल. बी. नगर, मल्कजगिरी, सेरिलिंगमपल्ली, पाटनचेरु, कुतुबुल्लापुर आणि सनथ नगर या मतदारसंघामध्ये जेएसपीचे विशेष लक्ष आहे. या मतदारसंघातील काही मतदारांनी २०१४ साली टीडीपीला मतदान केले होते, मात्र त्यानंतर हा मतदार भाजपाकडे वळलेला पाहायला मिळाला. या व्यतिरिक्त खम्मम जिल्ह्यातील मतदारसंघावर जेएसपीचा डोळा आहे, याठिकाणी मोठ्या संख्येने आंध्र प्रदेशमधील मतदार राहतात.

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर २०१४ सालच्या पहिल्यात विधानसभा निवडणुकीत तेलगू देसम पक्षाने तेलंगणातील १५ जागांवर विजय मिळविला होता. त्यापैकी सात जागा हैदराबादमधील होत्या. डिसेंबर २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीला फक्त तीन जागांवर विजय मिळविता आला. यावेळी टीडीपीचा मतदार सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि भाजपा पक्षाकडे वळल्याचे दिसले.

आणखी वाचा >> आंध्र प्रदेश : जगन मोहन रेड्डी यांच्या पराभवासाठी टीडीपी-जेएसपी एकत्र, भाजपालाही युतीत सामील होण्याचे आवाहन

हैदराबाद आणि आसपासच्या भागातील २४ विधानसभा मतदारसंघात आपला विस्तार करण्यासाठी भाजपाकडूनही प्रयत्न केले जात आहेत. या भागातून जेएसपीला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र जेएसपीचे एक नेते म्हणाले, “पवन कल्याण यांच्याकडे प्रचारासाठी फारसा वेळ नाही, त्यामुळे ते मतदारसंघावर किती प्रमाणात प्रभाव पाडू शकतील, यावर आताच काही सांगता येणार नाही. भाजपा नेत्यांनीही सांगितले की, त्यांनी आमच्याशी तेलंगणामध्ये युती केलेली नाही. त्यामुळे त्याठिकाणी जागावाटप करण्याचाही कोणताच मुद्दा उद्भवत नाही. राजकीयदृष्टया तेलंगणात आमचा फारसा प्रभाव नाही.”

दुसरीकडे सत्ताधारी भारत राष्ट्र समितीने मात्र जेएसपीचे आव्हान आमच्यासमोर नसल्याचे म्हटले. बीआरएस नेते एम. क्रिष्णांक म्हणाले की, जेएसपीची तेलंगणामध्ये राजकीय ताकद अजिबातच नाही, त्यामुळे या निवडणुकीवर ते फारसा प्रभाव टाकू शकणार नाहीत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan kalyan declares plans for telangana eyes 32 seats mostly urban kvg