-संजीव कुळकर्णी
जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात प्रचंड हानी झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही भागातील नुकसानीची शनिवारी पाहणी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी परिवाराच्या व्यथा त्यांनी ऐकल्या; पण आपत्तीच्या प्रसंगात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. १५७० गावांतील सुमारे ३ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले. इतर बाबींचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर असताना, माजी पालकमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या चमूने जिल्ह्यातील एकाही तालुक्याला प्रत्यक्ष भेट दिली नाही किंवा विशिष्ट भागात जाऊन कोणाचीही विचारपूस केली नाही.
एकनाथ शिंदेही मळलेल्या वाटेनेच; मालेगाव जिल्हा निर्मिती विषयी केवळ सकारात्मकतेचा सूर
मधल्या काळात चव्हाण यांच्याशी संबंधित भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया जारी असताना अशोक चव्हाण येथे तळ ठोकून होते. त्याचवेळी शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्यानंतर १६ जुलै रोजी मुंबईला निघून गेलेले चव्हाण पुढच्या दोन आठवड्यात कर्मभूमीत आलेच नाहीत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा विरोधी बाकावर आल्यानंतरचा पहिला नांदेड दौरा चव्हाणांच्या गैरहजेरीत पार पडला.
सत्तेच्या राजकारणात गर्दीचेही रंग वेगळे
मागील वर्षीही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. खरीप क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तेव्हा जिल्ह्याचे पालकत्व करणाऱ्या चव्हाण यांनी केवळ आपल्या विधानसभा क्षेत्रातील नुकसानीची पाहणी केली होती. किनवट-माहूर-हिमायतनगर या तालुक्यांकडे त्यांनी तेव्हाही पाठ फिरवली होती. यंदा ऐन पावसाळ्यातच सत्तेतून पायउतार झालेले काँग्रेस नेते सत्तांतरामुळे बसलेल्या धक्क्यातून अद्यापही सावरले नाहीत, असा अर्थ आता लावला जात आहे.
दरम्यान, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी सकाळी सर्वप्रथम माहूर तालुक्यात दाखल झाले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता ते माहूरजवळच्या दत्तमांजरी शिवारातील शेतात पोहोचले. दत्तमांजरी व मांडवा शिवारात देवस्थानाची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीनंतरही शासन अनुदान मिळत नाही, ही बाब पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत कशी मिळवून देता येईल यात लक्ष घालणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार प्रदीप नाईक, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिंदे सांगा, गुन्हा कोणावर दाखल करायचा? –
अजित पवारांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येलाच माहूर तालुक्यात पाचुंदा येथे विजय शेळके या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मागील काही आठवड्यात मराठवाडा आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रकार वाढले असले तरी नव्या सरकारने त्यात गंभीरपणे लक्ष घातलेले नाही़. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय, मग या प्रकरणांचा गुन्हा कोणावर दाखल करावा ते एकनाथ शिंदेंनीच सांगावे, असा टोला पवार यांनी लगावला.