अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने एकहाती विजय मिळवला. अरुणाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा सलग तिसर्यांदा विजयी झाला. भाजपाने राज्य विधानसभेच्या ६० जागांपैकी ४६ जागा जिंकल्या. भाजपाने मागील निवडणुकीत ४१ जागांवर जागांवर विजय मिळविला होता. १९९९ नंतर काँग्रेसने ५३ जागा जिंकल्या होत्या, तेव्हापासून अरुणाचल प्रदेशमधील हा सर्वांत मोठा विजय आहे.
बहुमताने विजय मिळाल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू म्हणाले की, हा एक ऐतिहासिक दिवस. मी राज्यातील जनतेचे आभार मानू इच्छितो. जनतेने भाजपाच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासाला कौल दिला आहे. या विजयासह खांडू यांनी पक्षात आपले स्थान पक्के केले आहे. पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, या विजयाने त्यांना राज्यातील भाजपाचे दोन वरिष्ठ नेते किरेन रिजिजू व तापीर गाओ यांच्याही पुढे नेले आहे. पेमा खांडू कोण आहेत. त्यांनी ईशान्येकडील राज्यात भाजपाला जिंकण्यासाठी कशी मदत केली? जाणून घेऊ या.
हेही वाचा : Exit Poll: २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये एक्झिट पोलचा अंदाज किती अचूक होता?
पेमा खांडू यांचे वैयक्तिक आयुष्य
मोनपा जमातीतील पेमा खांडू गौतम बुद्धांना मानतात. ते प्रामुख्याने चीनच्या सीमेजवळ असलेल्या तवांग येथे राहतात. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवी मिळवली. खांडू क्रीडाप्रेमी असून, त्यांना फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन व व्हॉलीबॉल या खेळांची आवड आहे. त्यांनी राजकारणात आल्यापासून खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे. त्यांना प्रवासाचीही आवड आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यावर ते विशेष भर देतात. त्यांना संगीतात रस असल्याचेही समजते. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांची लोकप्रिय गाणी गातानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ आहेत. भाजपा नेते आणि लोक त्यांचे वर्णन मृदुभाषी, असे करतात. पेभारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असलेले पेमा खांडू हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे मानले जातात.
पेमा खांडू यांचा राजकीय प्रवास
पेमा खांडू यांचे वडील माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यानंतरच पेमा खांडू यांच्या खर्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. वर्षभरापूर्वी २००० साली काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या खांडू यांनी वडिलांच्या मुक्तो मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकली. येथूनच त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आणि यशाचे शिखर गाठले. २०१४ मध्ये खांडू मुक्तोमधून बिनविरोध विजयी ठरले आणि जलसंपदा विकास व पर्यटनमंत्री झाले. त्यांनी विविध मंत्रिपदे भूषवली. नबाम तुकी सरकारमध्ये त्यांची नगरविकास मंत्री म्हणून नियुक्ती झाली. परंतु, त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले आणि काँग्रेसवर नाराज असलेले नेते कालिखो पूल यांची बाजू घेतली.
२०१६ मध्ये घटनात्मक पेचप्रसंगामुळे जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा खांडू हे भाजपाच्या पाठिंब्याने कालिखो पूल यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे मंत्री झाले. परंतु, नंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या निर्णयाला घटनाबाह्य ठरवले आणि तुकी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद आले. परंतु, तुकी यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या काही तास आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि वयाच्या ३७ व्या वर्षी खांडू जुलै २०१६ मध्ये भारतातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरले.
दोन महिन्यांनंतर सप्टेंबर महिन्यात खांडू यांनी ४३ काँग्रेस आमदारांसह पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए)मध्ये प्रवेश केला आणि डिसेंबरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये पेमा खांडू मुक्तो विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले आणि कोणत्याही राजकीय अडथळ्याशिवाय मुख्यमंत्री झाले.
बहुमताने विजय आणि पेमा खांडू प्रकाशझोतात
रविवारी अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपा बहुमताने विजयी झाल्यानंतर पेमा खांडू म्हणाले, “आम्हाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्याने आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक जनादेश आहे.” भाजपा आणि काँग्रेसमधील त्यांच्या कार्यकाळातील फरकाबद्दल विचारले असता, त्यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “त्या काळात काँग्रेसचे ईशान्येत वर्चस्व होते. दुर्दैवाने दिल्लीतील त्यांच्या नेत्यांनी संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट केली. लाच घेतल्याशिवाय एकही प्रकल्प मंजूर झाला नाही. मीच काँग्रेसविरोधात बंड केले. मी भाजपामध्ये येण्यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर मला समजले की, दोन्ही पक्षांत खूप फरक आहे.
हेही वाचा : मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?
राज्यात सुरू झालेल्या विकास प्रकल्पांचे श्रेय अनेक जण पेमा खांडू यांना देतात. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सुमारे १७०० किमीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे आणि आता राज्यात विमानतळदेखील आहे. एका भाजपा नेत्याने ‘डेक्कन हेराल्ड’ला सांगितले की, हा खांडू यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. पेमा खांडू यांनी ज्या प्रकारे पक्षातील नेत्यांना बरोबर घेऊन काम केले, त्यावर लोकांनी विश्वास दाखवला. ते पुढे म्हणाले की, ज्या राज्यात पक्षांतर ही एक चिंताजनक बाब आहे, त्या राज्यात ही समस्या दूर करण्यात पेमा खांडू यांना यश आले आहे. “त्यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही महत्त्वाच्या नेत्यानं पक्ष सोडला नाही. खरं तर, काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)मधील अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करण्याची तयारी केली होती. त्यामुळे काँग्रेसला सर्व ६० जागांवर उमेदवार उभे करण्यात अपयश आले.” खांडू यांच्या पुढील मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.