हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या शिशिर धारकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला असाल तरी या पक्षप्रवेशानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. धारकर यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला लाभ होईल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

२५० गाड्यांचा ताफा घेऊन शिशिर धारकर आणि त्यांचे समर्थक मुंबईत मातोश्रीवर दाखल झाले. मोठ्या थाटामाटात त्यांच्या पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उध्दव ठाकरे यांच्या हातून धारकर यांनी शिवबंधन बांधून घेतले. ‘भाजपच्या वॉशिंग मशिन मध्ये तुम्ही जाऊ शकला असता, पण तुम्ही तसे केले नाहीत. लढवैय्या सेनेत आलात, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी धारकर यांचे स्वागतही केले.

हेही वाचा… समर्थकांची काँग्रेसवापसी, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान

पण धारकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाला खरच लाभ होईल का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. शिशीर धारकर हे माजी मंत्री कै. आप्पासाहेब धारकर यांचे पुत्र आहेत. पेण नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नगरपालिकेतील राजकारणावर त्यांची घट्ट पकड राहिली आहे. पण गेली दहा वर्ष ते सक्रीय राजकारणापासून अलिप्त राहिले आहेत.

हेही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसची आता ‘एकनिष्ठतेची मोहिम’

कारण होते ते पेण अर्बन बँक घोटाळ्याचे. रिजर्व्ह बँकेने २०११ मध्ये पेण अर्बन बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातले. यावेळी शिशिर धारकर हे बँकेचे अध्यक्ष होते. बँकेच्या संचालक मंडळाने ११९ जणांना कागदपत्राची पुर्तता न करताच जवळपास ७३४ कोटी रुपयांचे बोगस कर्जांचे वितरण केले. त्यामुळे ७५ वर्षांची पंरपरा असणारी ही बँक अडचणीत सापडली. बँकेचे एकूण १ लाख ९३ हजार ६४१ खातेदार आहेत. या खातेदारांच्या बँकेच्या १८ शाखांमध्ये ६३२ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी बँकेत होत्या. या ठेवी अडचणीत सापडल्या.

हेही वाचा… जतमध्ये माजी आमदाराचेच भाजप नेतृत्वाला आव्हान

२३ सप्टेंबर २०१० ला पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले, सातत्याने ऑडीट रिपोर्ट मध्ये अ वर्ग मिळवणारी ही बँक एकाएकी अडचणीत आली. पावणेदोन लाख ठेवीदारांच्या पायाखलची जमिन सरकली. या प्रकरणात शिशिर धारकर यांच्या समवेत बँकेच्या संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु असून शिशिर धारकर हे मुख्य आरोपी आहेत. ठेवीदारांच्या अजूनही जवळपास सहाशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.

हेही वाचा… यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या महिला नेत्यांकडे काँग्रेसमध्ये महत्त्वाची जबाबदारी

अशा परिस्थितीत शिशिर धारकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन ठाकरे गटाने नेमकं काय साध्य केले असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. धारकर यांना मानणारा एकेकाळी मोठा गट पेण मध्ये होता. मात्र बँक घोटाळ्यानंतर त्यांच्या प्रतिमेचे भंजन झाले. आधीच शिवसेनेच्या तीन आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना उध्दव ठाकरे गटाची अवस्था जिल्ह्यात तोळामासा झाली आहे. अशातच धारकर यांच्यासारख्या वादग्रस्त व्यक्तीना पक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढणार की घटणार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीनंतर स्पष्ट होईल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pen urban bank scam accused shishir dharkar joined thackeray group how much it benefits print politics news asj