हिंगोली: जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरू झाली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी तीन वाजता येणार म्हणून कार्यकर्ते आणि हिंगोलीकर पाच तास ताटकळत बसले होते. रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यांनी अतिवृष्टीची पाहणीच न केल्याने शेतकरी नाराज झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आश्वासनांचा पाऊस पाडला. राज्याच्या इतिहासात शेतकऱ्यांना आजवरचा सर्वाधिक निधी दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. महात्मा गांधी चौकात मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी ठिकठिकाणचे रस्ते बंद केले होते. त्यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण झाली होती.
दुपारपासूनच बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते व नागरिक सभेच्या ठिकाणी हजर झाले होते. रात्री आठ वाजता मुख्यमंत्री शिंदे हिंगोलीत दाखल झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, राम कदम, माजी खासदार शिवाजी माने, राजेंद्र शिखरे, मनीष साखळे, श्रीराम बांगर, सुभाष बांगर, अशोक नाईक आदी उपस्थित होते.
मात्र नांदेडवरून येताना त्यांनी जिल्ह्याच्या नुकसानीची पाहणीही केली नाही. मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. तर वसमत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत करण्यााठी ५१ कोटी रुपयांची मदत लागणार असल्याचा अहवाल देखील प्रशासनाने पाठविला आहे.
शेतकऱ्यांसाठी मदतीच्या घोषणांबरोबरच लमाणदेव तीर्थक्षेत्राला ५ कोटी निधीबरोबरच कळमनुरी येथे शेळी मेंढी कार्यालयासाठी सकारात्मक आश्वासन देण्यात आले. कळमनुरी येथे आदिवासी भवन बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जातील आणि ते मिळवून देणारच, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. हळद संशोधन प्रक्रिया प्रकल्पात काही त्रुटी होत्या त्या दूर करून शंभर कोटी राज्य सरकारने मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.