दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना प्रचाराची पातळी घसरत चालली आहे. आरोप – प्रत्यारोपाची राळ उठवताना निंद्य शब्दांचा वारेमाप वापर केला जात आहे. गुंडा- पुंडांच्या भाषेचा राजकीय नेत्यांकडून वापर सुरू झाला आहे. चौकात येऊन आव्हान देण्याच्या प्रकाराने तर उभय पक्षातील नेत्यांवर सामान्य नागरिकांकडून टीकेची झोड उडवली गेली आहे.

कोल्हापूरचे उपनगर असलेल्या कसबा बावडा येथे राजाराम कारखाना आहे. राजाराम महाराजांच्या प्रयत्नाने सुरू झालेला हा कारखाना पुढे सहकार तत्त्वावर चालविला जाऊ लागला. गेली २७ वर्षे कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे एकहाती प्रभुत्व आहे. आता कारखान्याची सूत्रे त्यांचे सुपुत्र, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे आहेत. महाडिक पिता पुत्रांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कडवे आव्हान दिले आहे.

हेही वाचा >>>पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांचे शक्तिप्रदर्शन; बंडखोरांना आव्हान

गोकुळ नंतर महाडिक यांच्या ताब्यातील ही एकमेव महत्त्वाची संस्था काढून घेण्याचा सतेज पाटील यांचा इरादा असला तरी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अवघा महाडिक परिवार सत्ता कायम राखण्यासाठी प्रचारात उतरला आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पाटील यांना साथ दिली आहे. महाडिक यांच्या बाजूने खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठबळ दिले आहे. ‘ सतेज पाटील यांना विधान परिषदेत बिनविरोध पाठविण्याचे ठरले असता; त्यांनी राजाराम कारखाना बिनविरोध करण्याचा शब्द दिला होता, पण आता तो शब्द ते पाळत नाहीत,’ असा धक्कादायक खुलासा विनय कोरे यांनी केला असला तरी त्यावर सतेज पाटील यांनी अद्याप मौन पाळले आहे. विरोधी गटाचे २९ उमेदवार अपात्र ठरल्यानंतर सतेज पाटील यांनी उर्वरित उमेदवारांना घेऊन निवडणूक लढवणे भाग पडले आहे.

हेही वाचा >>>बी. एल. संतोष : कर्नाटक भाजपचे पडद्यामागील सूत्रधार

प्रचार तापला

गेल्या आठवड्याभरातील प्रचाराचा रागरंग पाहिला तर त्याचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. सभ्यतेच्या चौकटी मोडण्याचा चंग बांधूनच गावरान, गावंढळ अशा निंदनीय शब्दांची पेरणी दोन्ही आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी करण्याचा सपाटा लावला आहे. हा सारा प्रचाराचा प्रकार उबग आणणारा ठरला आहे. याचवेळी दोन्ही गटांनी सभासदांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी तोडीस तोड रणनीती आखली आहे. आमदार पाटील यांच्याकडून राजाराम कारखान्यातील गैरव्यवहार, उसाला कमी मिळणारा दर आणि महाडिक यांची घराणेशाही यावरून टीकेची झोड उठवली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना महाडिक कुटुंबीयांनी डी. वाय. पाटील कारखान्यातील पाटील घराण्याची मक्तेदारी, तेथील एकहाती कारभार यावर शरसंधान केले आहे. यामुळे प्रचार याच मुद्द्याभोवती घुटमळत राहिला आहे. प्रचारातील गर्हणीय शब्दप्रयोगांनी पातळी घसरत असताना वारे तापत चालले आहे.

हेही वाचा >>>नगर शहरातील अशांततेवर राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रयत्न

बिंदू चौकातील राजकीय तमाशा

सत्ताधारी गटाचा प्रचार शुभारंभ प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक यांनी ‘ ‘राजाराम’च्या कारभाराबाबत चर्चा करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी संध्याकाळी सात वाजता बिंदू चौकात यावे,’ असे आव्हान दिले. त्यानुसार ते तेथे दाखल झाले देखील. याचवेळी त्यांचे आव्हान स्वीकारून काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील हेही तेथे दाखल झाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने ऐतिहासिक बिंदू चौक शहारला. आधीच या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने बिंदू चौकात या दिवशी दिवसभर गर्दी असते. त्यातच आजी-माजी आमदारांनी राजकारणाचा आखाडा केल्याने समर्थकांच्या झुंडीमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. प्रत्यक्षात महाडिक – पाटील हे काही आमने-सामने आले नाहीत; नुसतेच ललकारले, डरकाळ्या फोडणे सुरु राहिले. फुकाच्या बेटकुळी फुगवण्याच्या या आपदप्रसंगामुळे कोल्हापुरच्या पुरोगामित्वाला तडा गेला. विविध थरातील लोकांनी संताप व्यक्त केला. दोन नेतेमंडळींच्या व्यक्तिगत वादात कोल्हापूरकरांना का वेठीस धरले जात आहे, असा सवाल केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People of kolhapur district are upset over satej patil and mahadik political clashes politics print news amy
Show comments