ठाणे – दिवाळी पहाटचा मुहूर्त साधून ठाणे कल्याण डोंबिवलीत आज सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एका प्रकारे प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तलावपाळी येथे उपस्थित राहत ‘मला पुन्हा साथ द्या’ असा नारा दिला. तर डोंबिवलीत ढोलताशांची जागा ‘डिजे’ ने घेतल्याने तेथे ही राजकीय कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळाला.

ठाणे डोंबिवलीत दिवाळी पहाट, गुढीपाडव्याचे नवे वर्ष मोठ्या उत्साहात साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. शेकडोंच्या संख्येने युवक युवती पहाटेपासून राम मारूती रोड, फडके रोड, तलावपाळी येथे जमतात आणि उत्साहात दिवाळ सण साजरा करतात. दरवर्षी वाढत असलेला युवकांचा प्रतिसाद लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून या उत्सवांचे राजकीयकरण होताना पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत पाडवा, पहाट उत्सवांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कधीच आपल्या कवेत घेतले असून येथील कार्यक्रमांच्या आयोजनात ही मंडळी पुढे दिसू लागली आहेत. यंदा विधानसभा निवडणुकींच्या धामधुमीत दिवाळी पहाट उगवल्याने राजकीय नेत्यांनी यानिमित्ताने प्रचाराचा बार उडवून दिल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले.

हेही वाचा – मतविभाजनच्या धोक्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता, बंड शमविण्याची धडपड; काहींची बंडखोरीच प्रभावहीन

सर्वच पक्षांची ‘फटाके’बाजी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांपासून ठाण्यात तळ ठोकला असून मंगळवारी रात्री त्यांनी कोपरी येथे दिवाळी संध्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत प्रचाराचे निमित्त साधले. गुरुवारी सकाळपासूनच ते ठाण्याच्या तलावपाळी येथे उपस्थित राहिले. याच दरम्यान त्यांनी तीन हात नाकाजवळील रहेजा संकुल, पुढे तलावपाळी, त्यानंतर गोखले मिसळ आणि चहाचेही झुरके घेतले. या काळात त्यांनी ‘मला साथ द्या, मी तुमच्यासाठी योजना राबवेल’ असे आवाहनही युवकांना केले. मुख्यमंत्री शिंदे एकीकडे ठाण्याची पायधुळ झाडत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी जुन्या ठाण्यातील मुस चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करत तरुण ठाणेकर मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. राजन विचारे यांच्या कार्यक्रमात वेगवेगळी प्रचार गीते सातत्याने वाजवत पद्धतशीर प्रचार केला जात होता. मनसेचे अविनाश जाधव यांनी राम मारूती रोड येथे आयोजित केलेला असाच कार्यक्रम युवक युवकांसाठी आकर्षण ठरला. भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी स्वत: कोणताही कार्यक्रम आयोजित केला नाही, मात्र नौपाडा आणि जुन्या ठाण्यातील एकही दिवाळ पहाट कार्यक्रम त्यांनी चुकवला नाही.

हेही वाचा – बंडोबांच्या शांतीसाठी भाजप नेत्यांवर जबाबदारी

डोंबिवलीत राजकीय कलगी तुरा

डोंबिवलीतील फडके रोडवरील दिवाळी पहाट कार्यक्रमात वाजणाऱ्या ढोलताशांची गंमत मोठी न्यारी असते. यंदा मात्र ढोलताशांऐवजी डिजेला परवानगी देऊन शासकीय यंत्रणांनी स्वत:चेच हसे करून घेतले होते. ‘तुम्हाला मराठी पारंपरिक ढोल नको, पण डिजे कसा चालतो ’ असा सवाल करत उद्धव ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी बुधवारी समाजमाध्यमांवर राजकीय वादाला तोंड फोडले होते. या मुद्द्यांवर समाजमाध्यमांवर जोरदार खडाजंगी होत असल्याचे पाहून अचानक शासकीय यंत्रणानी पहाटे डिजेसह ढोलताशांनाही परवानगी दिली. हा जणू आपल्याच मागणीचा विजय असल्याच्या आनंदात दीपेश म्हात्रे आणि मनसेचे उमेदवार राजू पाटील दिवस भर होते. या वादात खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची नीटनेटकी आखणी करत बाजी मारण्याचा प्रयत्न केला.