नाशिक : पुण्यातील फुले वाडा आणि नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या वाड्याच्या प्रतिकृती उभारण्यासाठी शहरातील मुंबई नाका परिसरातील ५४ गुंठे जागा उपलब्ध करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शविली आहे.शहरातील मुंबई नाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती कांस्य धातूच्या पुतळ्याचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

सर्वांना हेवा वाटेल असे हे प्रेरणादायी स्मारक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. कांस्य धातूच्या वापरामुळे हे पुतळे मजबूत झाले आहेत. फुले दाम्पत्याने उत्तुंग असे काम केले. रस्ते, पूल, मेट्रो, विविध प्रकल्पांची उभारणी म्हणजे विकास नाही. सामाजिक बांधिलकी व दुर्बल घटकांना मदत महत्वाची आहे. महात्मा फुले हे उद्याोजक होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. औद्याोगिक पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. सावित्रीबाई फुले यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य सरकार काम करीत आहे. लाडकी बहीण, लेक लाडकी-लखपती, अन्नपूर्णा या योजनांसह मुलींना उच्चशिक्षण मोफत शिक्षण देऊन सरकार महिला सक्षमीकरणासाठी काम करीत असल्याचा दाखला त्यांनी दिला.