सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस घराणेशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या भाषणांचा उल्लेख करत काँग्रेस भारतीयांना कमी लेखत असल्याचंही ते म्हणाले. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३७० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकंदरीतच पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण काँग्रेस केंद्रित होतं. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रादेशिक पक्षावर टीका केली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच व्हावी, या उद्देशाने मोदी यांनी जाणीवपूर्वक काँग्रेसवर टीका केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे भाजपाने मागील दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला असला, तरी त्यांना उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांत प्रादेशिक पक्षांविरोधात लढताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला; त्यामुळेच मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा मुख्य मुद्दा ‘राम मंदिर’; काँग्रेस, बसपाची रणनीती काय? वाचा..

पंतप्रधान मोदी यांनी आक्रमकपणे काँग्रेसवर टीका केली असली तरी यात नवं काहीही नव्हतं. त्यांनी पुन्हा नेहरू गांधी कुटुंबाचा उल्लेख ‘शाही परिवार’ असा केला. तसेच राहुल गांधींचे नाव न घेता, काँग्रेस एकच वस्तू परत परत विकते, अशी खोचक टीकाही केली. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या वाक्यावरूनही काँग्रेसला टोला लगावला. ते म्हणाले, “काँग्रेस एकच वस्तू परत परत विकते, त्यांच्या अशा वागण्यामुळे आता काँग्रेसचं दुकान बंद होण्याची वेळ आली आहे.”

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी इंडिया आघाडीबाबतही प्रतिक्रिया दिली. ”काही दिवसांपूर्वी विरोधकांनी युक्ती केली. मात्र, आता ते पुन्हा एकत्र फिरत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला. “काँग्रेस पक्ष केवळ एका कुटुंबाचा विचार करतो, त्यामुळे ते लोकांच्या आशा आकांक्षा कधीच पूर्ण करू शकत नाहीत. काँग्रेसने भारतीयांच्या क्षमतेवर कधीही विश्वास ठेवला नाही. ते नेहमी स्वतःला राज्यकर्ते आणि जनतेला तुच्छ मानतात”, असेही ते म्हणाले.

यासंदर्भात काँग्रेसचे वरिष्ठ नेते ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले, ”मोदींनी केवळ काँग्रेसवर टीका केली, याचं कारण म्हणजे आगामी निवडणुकीत काँग्रेसच आपला मुख्य विरोधी पक्ष असल्याचे पंतप्रधान मोदींना सांगायचे होते. त्यांनी इंडिया आघाडीवर म्हणावी तशी टीका केली नाही. विशेष म्हणजे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच इंडिया आघाडीला ‘अहंकारी’ असे म्हटले होते.”

पंतप्रधान मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनेही त्यांना प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट शेअर करत म्हणाले, ”पंतप्रधान मोदी काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांनी घराणेशाहीवरून काँग्रेसवर टीका केली. मात्र, गांधी कुटुंबाने या देशासाठी बलिदान दिले आहे. भाजपाने या देशाच्या स्वातंत्र्य, एकात्मता आणि अखंडतेसाठी किती बलिदान दिलं? हे मोदींनी आधी सांगावं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “‘पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीतील प्रचाराप्रमाणे भाषण केले, त्यांना आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी करायची आहे. ते काँग्रेसच्या नेत्यांवरील भ्रष्टाचारांच्या कथित आरोपांवर बोलले. त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला. तसेच कर्पूरी ठाकूर यांना काँग्रेसने चुकीची वागणूक दिली, असा आरोपही केला. पण खरं हे आहे की, आम्ही जात आधारित जनगणना करण्याची मागणी करत आहोत, त्यामुळेच त्यांनी कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ दिला.”

हेही वाचा – नितीश यांना विश्वासदर्शक ठरावासाठी १२ तारखेपर्यंतचा वेळ; काँग्रेस नेत्यांना काय वाटते? जाणून घ्या

लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ”पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका करत सिद्ध केले की, ते काँग्रेस पक्षाला घाबरतात. खरं तर त्यांचं भाषण हे लोकसभेच्या निवडणूक प्रचाराप्रमाणे होतं. त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे पावित्र्य लक्षात ठेऊन भाषण करायला हवं होतं”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi criticized only congress in loksabha speech trying to make election congress vs bjp spb
Show comments