PM Modi Dinner pe charcha with BJP MLA : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची मदत घेतल्याचे आपण पाहिले आहे. यामध्ये २०१४ निवडणुकीच्या त्यांनी सुरू केलेली ‘चाय पे चर्चा’ असो की रेडिओवरील त्यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मोदी संवाद साधत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाच्या आमदारांबरोबर संवाद साधणारे विशेष कार्यक्रम घेत आहेत. ज्यामध्ये मोदी प्रशासन कौशल्य आणि लोकांच्या संपर्कात राहण्याची क्षमता सुधारण्याबाबत भाजपाच्या नेत्यांना अनेक महत्त्वाचे सल्ले देताना दिसत आहेत.

असाच एका कार्यक्रम रविवारी भोपाळ येथे रात्रीच्या जेवणावेळी आयोजित करण्यात आला होता. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांचा हे कार्यक्रम इतर राज्यांमध्ये देखील घेतले जाणार आहेत.

भोपाळ येथे दोन तास चाललेल्या संवादादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. यामध्ये मोदींनी त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर कशा पद्धतीने संपर्क कायम ठेवला आणि त्यांच्याबरोबर नाते कसे विकसित केले याबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी आमदार आणि खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित कसे केले पाहिजे आणि त्यासाठी एक मास्टर प्लॅन कसा तयार करावा, याबरोबरच चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्याची गरज यावरही त्यांनी भाष्य केले.

या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मध्यप्रदेशामधील भाजपा आमदारांनी सांगितले , पंतप्रधान मोदी यांनी पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर जेवण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. हा त्यांच्याबरोबर चांगले संबंध तयार करण्यासाठी चांगली पद्धत आहे असे त्यांनी सांगितले.

“त्यांच्या मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांना आणि इतरांना भेटायला जाताना ते कशा पद्धतीने जेवणाचा टिफिन घेऊन जातात याबद्दल बोलले. पक्षाच्या कामांबद्दल आणि विकासकामांबद्दल त्यांच्याशी बोलताना त्यांच्याबरोबर टिफिन वाटून घेतल्याने त्यांना प्रशासन सुधारण्यास मदत झाली,” असे एका आमदाराने सांगितले.

पंतप्रधान मोदी हे यांनी मतदारसंघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्याविषयी देखील नेत्यांना मार्गदर्शन केलेय. हे काही राजकारणाशी संबंधित नव्हते, तर प्रशासन आणि विकास याबद्दल होते, अशी माहिती एका आमदाराने दिली. अधिकाऱ्यांबरोबर चांगले आणि भक्कम संबंध निर्माण करण्याचे आवाहन देखील मोदींनी केले, असे दुसऱ्या एका आमदाराने सांगितले. त्यांनी आम्हाला प्रशासकीय अधिकार्‍यांशी वाद न घालण्याचा सल्ला दिला. तुम्हाला त्यांच्याकडून काम करवून घ्यायचे आहे, त्यामुळे त्यांच्याशी भांडू नका तर त्यांच्याशी मैत्री करा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला, असे एका आमदाराने सांगितले.

आमदारांनी राजकारणाशी संबंध नसलेल्या लोकांशीही संवाद साधण्याबद्दल प्रोत्साहन देण्याबरोबरच मोदींनी महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेचे महत्त्व देखील आमदारांना सांगितले. मतदारसंघातल्या महिलांना आम्ही भेटावे अशी पंतप्रधान मोदी यांची इच्छा होती. त्यांनी सांगितले की आपण योजनांच्या लाभार्थ्यांना भेटले पाहिजे आणि त्यांना केंद्रीय योजनांचा चांगला वापर करून घेण्यास प्रेरित केले पाहिजे. ते सांगत होते की त्यांनी कशा प्रकारे उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलेला त्यांच्यासाठी स्टोव्ह वापरून चहा करण्याची विनंती केली, असे एका आमदाराने सांगितले. पीएम आवास योजनेअंतर्गत महिलांसाठी आमदारांनी घरे बांधावीत असे आवाहन देखील मोदींनी आमदारांना केले.

भोपाळ मधील संवादापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी अशाच पद्धतीने ओडिशा येथील भाजपा आमदारांशी नोव्हेंबर मध्ये आणि महाराष्ट्रातील आमदारांशी जानेवारीमध्ये संवाद साधला होता. मोदींनी महाराष्ट्रात आमदारांशी साधलेल्या संवादादरम्यान स्वत:च्या जीवनातील उदाहरणे वापरून काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केले होते. पंतप्रधानांनी सत्तेचा आणि राजकारणाचा वापर लोकांच्या सेवेसाठी केला पाहिजे यावर भर दिला तसेच त्यांनी नेत्यांनी दरवर्षी आरोग्य तपासणी करावी आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवावा असेही आवाहन केले.

पहिल्या दोन कार्यकाळात पंतप्रधान मोदी संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात किमान एक किंवा दोनदा भाजपा खासदारांना संबोधित करत असतय राज्यानुसार खासदारांशी हा संवाद होत असे. हा संवाद बहुतेक वेळा रात्रीच्या जेवणाच्या किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी होत असे.

Story img Loader