जळगाव : लोकसभा निवडणुकीप्रमाणे शेतकऱ्यांचा रोष आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर निघू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांविषयक प्रश्न मांडले. परंतु मोदी यांनी आपल्या भाषणात त्याविषयी अवाक्षरही काढले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविवारी जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रियल पार्क मैदानात पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात मुख्यमंत्री शिंदे यांनी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मूल्य स्थिरीकरण योजना, सोयाबीन, दूध उत्पादकांशी संबंधित प्रश्न, नदीजोड प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड असे विषय मांडले. केंद्र सरकार हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> कारण राजकारण : भोकरमध्ये अशोक चव्हाणांसमोर पर्याय कोण?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला कृषीविषयक प्रश्नांची दखल न घेणे चांगलेच महागात पडले होते. कांदा निर्यातविषयक धरसोड धोरण, निर्यात मूल्य आणि शुल्क यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महायुतीकडे पाठ फिरविल्याने लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना १० ते १२ मतदारसंघांत फटका बसल्याचे उघड झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कांदा महाबँक योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेवरही शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केली. लखपती दीदी संमेलनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी कृषीविषयक विषय मांडले. परंतु, पंतप्रधानांनी भाषणात त्याविषयी साधा उल्लेखही केला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात ५० लाख लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार-पार- गिरणा नदीजोड योजनेेची निविदा काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाणार असल्याचे जाहीर केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi in jalgaon pm modi ignore farmers issues raised by cm eknath shinde print politics news zws