PM Modi-Omar Abdullah : काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणाऱ्या झेड-मोढ या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बोगद्याचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यासोमवारी झालेल्या उद्घाटनानंतर सोनमर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात चांगलीच जवळीक दिसून आली. इतकेच नाही तर ओमर अब्दुल्ला यांनी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला, तर पंतप्रधान मोदी यांनी देखील ओमर अब्दुल्ला यांच्या फोटोग्राफी कौशल्याची स्तुती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या स्वागताच्या भाषणात अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी आणि जम्मू काश्मीरची जनता यांच्यातील विश्वास वाढत असल्याचा मुद्दा मांडला. तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘दिल आणि दिल्ली’ मधील अंतर कमी करण्याबरोबरच मोदी आपली इतर आश्वासने कशी पूर्ण करत आहेत, याबद्दल भाषण दिलं.

अब्दुल्ला म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय योग दिन या दिवशी तुम्ही  (मोदींनी गेल्या वर्षी जूनमध्ये श्रीनगरमध्ये योग दिन साजरा केला होता)  लोकांशी संवाद साधला आणि त्यामुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागले. तुम्ही म्हणालात की तुम्ही दिल (हृदय) आणि दिल्ली मधील अंतर कमी करण्याच्या मार्गावर आहेत… आणि तुम्ही ते सिद्ध करून दाखवल. फक्त १५ दिवसात आणि (तुम्ही) ते सिद्ध केले आहे. अवघ्या १५ दिवसांत जम्मू-काश्मीरमधील तुमचा हा दुसरा कार्यक्रम आहे”.

मोदींनी काही दिवसांपूर्वी जम्मूसाठी एका वेगळ्या रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल्ला म्हणाले की, “असे प्रकल्प फक्त दिल (हृदय)पासूनच नाही तर दिल्ली पासून देखील अंतर दूर करतात”.

याबरोबरच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्‍यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यातील निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात निवडणुका घेतल्याबद्दल कौतुक केले, याबरोबरच त्यांनी जम्मू काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी देखील मांडली.

इंडिया आघाडीचा भाग असलेले अब्दुल्ला हे निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि त्यांच्या नेत्यांवर कडाडून टीका करत होते. पण जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून त्यांची भूमिका वेगळी राहिली आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींकडून माझ्यावर कोणताही दबाव नाही असे ओमर अब्दुल्ला म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी यांनीही त्यांच्या भाषणाची सुरूवात अब्दुल्ला यांची स्तुती केली. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी काढलेले सोनमर्गचे फोटो जे त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले होते, त्याबद्दल पंतप्रधान मोदी बोलले. इतकेच नाही तर मोदींनी अब्दुल्ला यांच्या श्रीनगर मॅरेथॉनमधील सहभागाबद्दल देखील भाष्य केलं.

मोदी म्हणाले की, “पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन श्रीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती…. मुख्यमंत्र्‍यांनी देखी यामध्ये सहभाग घेतला आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ते दिल्लीत भेटले तेव्हा मी त्यांचे विशेष अभिनंदन केले. आमच्या संभाषणादरम्याम मला त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. त्यांनी मॅरेथॉनबद्दल विस्ताराने माहिती दिली.”

अब्दुल्ला यांच्याप्रमाणेच चांगल्या गोष्टी बोलून झाल्यावर पंतप्रधान मोदी हे राज्याच्या दर्जा देण्याविषयीच्या अवघड मुद्द्याकडे वळले. ते म्हणाले की, “हा मोदी आहे… त्याने आश्वासने दिले तर तो पूर्णही करतो. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, योग्य गोष्टी योग्य वेळी घडतील”.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या जम्मू आणि काश्मीर मधील पायाभूत सुविधांसंबंधी प्रकल्पांबद्दल माहिती दिली. त्यांनी या प्रकल्पांमुले जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे दिल्लीपासून अंतर कमी झाल्याचा मुद्दा देखील मांडला. सोनमर्ग बोगद्याबरोबरच गडकरींनी झोजिला बोगदा (Zojila tunnel), श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, काश्मीरला जम्मूमधील किश्तवाडशी जोडणारा वैलू बोगदा (Vailoo tunnel) आणि जम्मूच्या पूंछ भागाला बारामुल्लाशी जोडणारा प्रस्तावित रस्ता यासारख्या प्रकल्पांबद्दल भाष्य केले. हे प्रकल्प सर्व ऋतूंमध्ये जम्मू काश्मीरला कनेक्टिव्हिटी देतात, तसेच यामुळे या प्रदेशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील याचे विशेष महत्व आहे.

खासदाराची कार्यक्रमाला दांडी

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि अनेक आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण यामध्ये खासदार रुहुल्ला मेहदी हे श्रीनगरचे खासदार ज्यांचा मतदारसंघ श्रीनगर सोनमर्ग आहे ते मात्र या कार्यक्रमाला गैरहजर होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. हे खासदार त्यांचा पक्ष नॅशनल कॉन्फ्रसच्या सरकारवर टीका करण्यासाठी ओळखले जातात. आता ते या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने पक्ष आणि त्यांच्यातील अंतर आणखी वाढलं आहे. अब्दुल्ला यांनी मोदींची स्तुती केल्याबद्दल आणि जम्मू-काश्मीरचे राजकारण आणि राजकीय मुद्दे सोडून दिल्याबद्दल विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi omar abdullah takeaways from z morh tunnel inauguration in sonamarg jammu kashmir politics marathi news rak