नागपूर : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकीय वाऱ्याची दिशा जशी बदलेल तसे कालचे विरोधक आज मित्र होतात तर मित्र दूर जातात. असेच काहीसे वर्णन रविवारी गोंदियाच्या बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीचे करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी पटेल यांचे नाव न घेता त्यांची जागा तुरुंगात आहे, अशी जहरी टीका केली होती. त्याच पटेलांकडून मोदी यांनी स्वागत स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गोंदियामार्गे छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी गेले. या दौऱ्यासाठी मोदी यांचे सकाळी गोंदियाच्या बिरसी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर येथून मोदी हेलिकॉप्टरने पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.

हेही वाचा – “दुष्काळ जाहीर करताना चेहरे बघून सरकारने घोषणा केली”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप

मोदी -पटेल यांच्या भेटीचे छायाचित्र माध्यमावर झळकताच त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडारा – गोंदिया मतदारसंघात आले होते. निवडणूक रिंगणात प्रफुल्ल पटेल नव्हते राष्ट्रवादीचे पंचबुधे हे उमेदवार होते. पण मोदींनी त्यांच्या भाषणात पटेल यांचे नाव न घेता ‘येथील एका नेत्याची जागा तुरुंगात आहे’ अशी टीका केली होती.

हेही वाचा – “राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात आणण्याचे काम करीत आहे”, नाना पटोले यांचा आरोप

भंडारा – गोंदिया हा पटेल यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे मोदींची टीका पटेल यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतरच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा पटेल यांच्या मागे लागला होता. दरम्यान पटेल यांनी ते राष्ट्रवादीत असताना भंडारा – गोंदिया जिल्ह्यात कॉंग्रेसला दूर सारत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपशी जवळीक साधली होती. मधल्या काळात राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार गटाने भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीत पटेल यांची भूमिका महत्त्वाची होती. कालचे विरोधक अशा प्रकारे मित्र झाले. रविवारची गोंदिया विमानतळावरील मोदी – पटेल भेट याच कारणासाठी चर्चेचा विषय ठरली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi praful patel meet at birsi airport in gondia recalls modi criticism of patel in 2019 campaign rally print politics news ssb
Show comments