पुणे : ‘जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० पुन्हा आणण्याचा, तसेच आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा डाव’, ‘एक है तो सेफ है’ आदी मुद्द्यांचा पुनरुच्चार करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुण्यात मध्यमवर्गाचा ठळक उल्लेख करून, ‘मध्यमवर्गीयांची प्रगती होते, तेव्हा देशाचीही प्रगती होते,’ असे वक्तव्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे जिल्ह्यातील २१ आणि सातारा जिल्ह्यातील १० अशा एकूण ३१ विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची सभा झाली. ‘भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय लोकशाही आघाडीने नेहमीच मध्यवर्गीयांना प्राधान्य दिले आहे. मध्यमवर्ग हा देशाचा कणा आहे. हाच वर्ग संपत्ती निर्माण करतो. काँग्रेसवगळता महाविकास आघाडीतील अन्य पक्ष वा नेत्यांवर थेट टीका करण्याचे टाळून पंतप्रधानांनी आपल्या भाषणात मध्यमवर्गासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा पाढा वाचून एक प्रकारे भाजपच्या शहरी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते.

शरद पवार, उद्धव यांचा उल्लेख नाही

लोकसभेच्या प्रचारासाठी पुण्यातील रेसकोर्सवर झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. त्याचा भाजपला लोकसभेत फटका बसल्याचे मानले जाते. मंगळवारी झालेल्या सभेत पंतप्रधानांनी शरद पवार किंवा त्यांच्या पक्षावरही टीका करण्याचे टाळले. तसेच, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका टाळली.

हेही वाचा >>> “काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची, त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा… ”; पुण्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षड्यंत्र

सोलापूर : काँग्रेसचा आरक्षणविरोध हा अलीकडचा नाही, तर खूप जुना आहे. आज दलित, आदिवासी, भटके, ओबीसींची होत असलेली एकजूट काँग्रेसच्या ‘शाही परिवारा’साठी डोकेदुखीची ठरली आहे. सर्व वंचित, उपेक्षितांची एकजूट कायम राहिली, तर शाही परिवाराला सत्ता मिळणार नाही. म्हणूनच या सर्व समाजघटकांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागण्याचे नवे षडयंत्र काँग्रेसकडून खेळले जात आहे. हा डाव वेळीच सावधानता बाळगून हाणून पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गांधी परिवार यांचे नाव न घेता मोदी यांनी हा हल्लाबोल केला.

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी मंगळवारी दुपारी सोलापुरात होम मैदानावर पंतप्रधान मोदी यांची प्रचार सभा झाली. त्या वेळी त्यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेस, राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले.या सभेस लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

विकासकामे रोखण्यात महाविकास आघाडी तज्ज्ञ

चंद्रपूर : राज्यातील महायुती सरकार गतीने प्रगतीची कामे करत आहे, तर महाविकास आघाडीने विकास कामांना ब्रेक लावण्यात पीएचडी मिळवली आहे. महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

चिमूर येथे मंगळवारी आयोजित पूर्व विदर्भातील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक येत आहे. अनेक विमानतळ निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात जवळपास १२ वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. आघाडीच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले. आघाडीने कधीही विकासाची कामे होऊ दिली नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे आपल्या संविधानानुसार पदाची शपथ घेत नव्हते. त्याचे अनुच्छेद ३७० कलमाची अडचण होती. आम्ही ती अडचण दूर केली. परंतु, पाकिस्तानला हवे असलेले काम काँग्रेस करत आहे असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचा आरक्षणविरोध हा अलीकडचा नाही, तर खूप जुना आहे. दलित, आदिवासी, भटके, ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा काँग्रेसचा खटाटोप आताचाच नाही, तर आरक्षणविरोधात काँग्रेसने यापूर्वी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. जरूर तर जुनी वर्तमानपत्रे काढून पाहा, असे त्यांनी नमूद केले. गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाजघटकांना एकमेकांपासून तोडण्याचे पाप काँग्रेसकडून होत आहे. सर्व समाज घटक विभागले, तरच काँग्रेसला प्राणवायू मिळू शकतो. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi rally in pune pm modi mega roadshow in pune ahead of maharashtra assembly elections print politics news zws