What is Hindu rate of growth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारवर टीका केली. जीडीपी वाढीला ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हटले जात असल्याने काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे हिंदूंची प्रतिमा मलिन झाली असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.
भाजपाने यापूर्वी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’च्या विरोधात ‘द हिंदुत्व रेट ऑफ ग्रोथ’ ही संज्ञा मांडली होती.
“एक काळ होता जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवली जात होती. म्हटले जात असे की ते (भारत) ३ टक्क्यांच्या पुढे वाढू शकत नाही. याला हिंदू ग्रोथ रेट म्हटले जात असे. अशा पद्धतीने आपल्याला हिणवले जात असे. पण जेव्हापासून आम्ही आलो आहोत (सत्तेत)… आता हे (जीडीपी ग्रोथ रेट) हा ७.८ टक्के आहे कारण सध्या ते लोक सत्तेत आहेत ज्यांचा हिंदूत्वावर विश्वास आहे,” असे त्रिवेदी म्हणाले होते.
हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणजे काय ?
अर्थशास्त्रज्ञ राज कृष्णा यांनी ही संज्ञा मांडली असून ती १९८२ पासून वापरली जात आहे. त्या काळातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांच्या विचारसरणीशी कृष्णा यांच्याशी कृष्णा यांचा काहीही संबंध नव्हता, उलट कृष्णा हे काही प्रमाणात उजव्या विचारसरणीचे होते असे म्हटले जाऊ शकते.
आणीबाणीच्या काळात कृष्णा हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिकवण्याचे काम करत होते. १९७७ साली इंदिरा गांधी यांचे सरकार कोसळल्यानंतर ते जनता पक्षाच्या सरकारकच्या काळात नियोजन आयोगाचे सदस्य बनले. याच काळात ते राज्यांना निधी मंजूर करणाऱ्या सातव्या अर्थ आयोगाचे सदस्य देखील होते.
१९७९ साली त्यांनी पुन्हा शिकवण्याचे काम सुरू केले जे त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच १९८५ पर्यंत सुरू होते. द न्यू ऑक्सफर्ड कम्पेनियन टू इकॉनॉमिक्स इन इंडिया (OUP) नुसार, या काळात त्यांनी ‘द हिंदू रेट ऑफ ग्रोथ ‘ (The Hindu Rate of Growth) प्रसिद्ध वाक्प्रचार तयार केला. यामाध्यमातून त्यावेळी भारतात दिसून येणाऱ्या ३.५ टक्के इतक्या अत्यंत कमी विकास दराकडे लक्ष वेधण्यासाठी साधन म्हणून हे वापरण्यात आले होते. बदलती सरकारे, य़ुद्ध, दुष्काळ आणि इतर अनेक संकटांमध्ये हा विकासाचा दर स्थिर राहिला होता, जी त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक घटना ठरली, म्हणूनच त्याच्यासाठी ही संज्ञा (द हिंदू रेट ऑफ ग्रोथ) वापरात आली.
भारतात ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ पेक्षा जास्त वाढ नोंदवली?
प्रथमदर्शीन असे दिसून येते की भारताची वाढ ही १९९१ च्या धोरणात्मक बदलानंतर सुरू झाली . पण जीडीपी मधील वाढीसंबंधीत डेटानुसार हिंदू रेट ऑफ ग्रोथ रेट ३.५ टक्क्यांपेक्षा जास्तीच्या वाढीला त्याच्या आधीपासून सुरूवात झाली होती. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमीक अँड पॉलिटिकल विकलीच्या एका लेखामध्ये कॅनडातील McGill विद्यापीठाचे प्राध्यापक दिवंगत बलदेव राज नायर यांनी दावा केला होता की उदारीकरणामुळे आर्थिक वाढीला चालना नक्कीच मिळाली मात्र हेही इतकेच खरे आहे की… १९८० च्या दशकातील अंतर्गत आर्थिक धोरण सुधारणामुळेही त्याला चालना मिळाली.
हिंदुत्व रेट ऑफ ग्रोथ काय आहे?
त्रिवेदी यांनी ७.८ टक्के याला हिंदुत्व रेट ऑफ ग्रोथ म्हटले आहे तो कोरोना महामारीनंतरच्या सरासरी जीडीपी वाढीच्या दराशी संबंधित आहे. यामध्ये लक्षणीयरित्या बदल करण्यात आले आहेत.
२०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांमध्ये भारताचा सरासरी वार्षिक जीडीपी ग्रोथ रेट हा ७.८ टक्के आहे हे तसेच पाहाता खरे असले तरी, असे मोजमाप करताना विकास दरा कसा मोजला जातो हे सोयीस्करपणे विसरले जाते. खरं तर, जर एखाद्याने आकडेवारी बारकाईने पाहिली तर हे स्पष्ट होते की हिंदुत्व रेट हा हिंदू रेट ऑफ ग्रोथ सारखाच आहे. कोरोनानंतर उंचावलेला ग्रोथ रेट्स हे कोरोनाच्या काळातील वर्षामध्ये झालेल्या इकॉनॉमिक कॉन्ट्रॅक्शनचा थेट परिणाम आहे.
२०२०-२१ मध्ये भारताचा जीडीपी जवळजवळ ६ टक्क्यांनी घसरला आणि यामुळे पुढच्या वर्षी जीडीपी वाढीचा दर जास्त असल्याचे चित्र निर्माण झाले. उदाहरण पाहायचे झाल्यास जरी गेल्या तीन वर्षांमध्ये भारताची सर्वाधिक जीडीपीची वाढ २०२१-२२ मध्ये (९ टक्क्यांपेक्षा जास्त) झाली असली तरी खरं पाहाता जीडीपी कोरोनाच्या आधीच्या तुलनेत फक्त ३ टक्के इतकाच वाढला आहे.
दुसर्या शब्दांत सांगायचे तर, पुढील दोन वर्षांत कोरोनाच्या आधीच्या तुलनेत जीडीपी एकूण ३ टक्क्यांनी वाढला. त्यामुळे जीडीपी वाढीचा दर मोजण्याची योग्य पद्धतीनुसार हिंदुत्व रेट मोजताना कोरोना काळात झालेले कॉन्ट्रॅक्शनचा देखील विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा आपण कोरोना काळातील वर्षाच्या डेटाचा समावेश यामध्ये करतो तेव्हा संपूर्ण चित्र बदलून जाते आणि हिंदुत्व रेट हा देखील हिंदू रेट ऑफ ग्रोथ सारखाच दिसू लागतो.