मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यावेळी ते मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी अशा १२.५ किमी टप्प्याचे लोकार्पण बीकेसी मेट्रो स्थानकात पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मुंबई महानगर प्रदेशातील विकास कामांच्या लोकार्पणाचा, भूमिपूजनाचा धडाका लावत मतदारांना आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या लांबीच्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आरे – बीकेसी टप्प्याच्या संचलनासाठी एमएमआरसीला मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले नव्हते. या सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय मेट्रो संचलन करताच येत नाही. त्यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून केंद्र सरकारकडून सीएमआरएसच्या चाचण्यांना वेग देण्यात आला होता. अखेर बुधवारी रात्री चाचण्या पूर्ण करून सीएमआरएसकडून एमएमआरसीला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने आरे-बीकेसी टप्प्याच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता शनिवारी सायंकाळी ६ वाजता पतंप्रधानांच्या हस्ते १४ हजार १२० कोटी रुपये खर्चाच्या आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी पंतप्रधान बीकेसी ते सांताक्रुझ मेट्रो स्थानकांदरम्यान भुयारी मेट्रोने प्रवास करणार आहेत.

हेही वाचा >>> पंतप्रधानांच्या रेवडी संस्कृतीवर शरद पवारांची टीका

ठाण्यातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करून ठाणे शहराला मेट्रोने जोडण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने १२ हजार २०० कोटी रुपये खर्चाचा ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. २९ किमी लांबीच्या, २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो प्रकल्पास नुकतीच केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. २६ किमी उन्नत आणि ३ किमी भुयारी अशी ही मार्गिका असून या ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाची पायाभरणीही यावेळी होणार आहे. तर नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पाच्या टप्पा-१ चीही पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच ७०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजनही यावेळी केले जाणार आहे.

मुंबई – ठाणे प्रवास अतिवेगवान करून मुंबई, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्गाचा छेडानगर – ठाणे दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला होता. त्यानुसार शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान या प्रकल्पाचेही भूमिपूजन करणार आहेत.

पॉडटॅक्सीचे भूमिपूजन लांबणीवर

शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते बीकेसीतील पॉडटॅक्सी प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, या प्रकल्पासाठीची एक परवागनी अद्याप न मिळाल्याने पॉडटॅक्सीचे भूमिपूजन शनिवारी होणार नाही.

लाडक्या बहिणींच्या मेळाव्यासाठी शाळेची बस

छत्रपती संभाजीनगर : पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमास लाभार्थी कुटुंबांची वाहतूक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १५० बसची पूर्वनोंदणी करण्यात आली होती. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमधील कार्यक्रमास बस देण्याची आगाराची क्षमता संपल्याचे आगारप्रमुखांनी कळवले. त्यामुळे प्रशासनास काही शाळांच्या खासगी बस मिळाव्यात यासाठी धावपळ करावी लागली. शिक्षणाधिकाऱ्यांनी या अनुषंगाने खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र दिले आहे.

६ ऑक्टोबरला लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे संमेलन होणार आहे. त्यामुळे प्रशासनाची दोन दिवसांपासून धावपळ सुरू आहे. शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या या कार्यक्रमास किमान २० हजारांहून अधिक लाभार्थी महिलांना घेऊन येण्यासाठी वाहतूक नियोजन केले जात आहे. गावागावांतील महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी लागणाऱ्या बसची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, अकोला येथील पंतप्रधानांच्या उपस्थितीमधील कार्यक्रमास १५० बस देण्यात आल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबईकरांचा भुयारी मेट्रो प्रवास रविवारपासून?

आरे-बीकेसी टप्प्याचे शनिवारी सायंकाळी ६ वाजता लोकार्पण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान बीकेसी – सांताक्रुझ मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसह विद्यार्थी आणि मजुरांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान परतल्यानंतर शनिवारी रात्रीपासून भुयारी मेट्रो मुंबईकरांसाठी खुली होईल की मुंबईकरांना रविवारी सकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल याची कोणताही स्पष्टता अद्याप नाही. एमएमआरसीकडे याबाबत विचारणा केली असता शनिवारी सकाळी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वादग्रस्त मंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थितीमुळे आश्चर्य

नागपूर/यवतमाळ : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी येत आहेत. सकाळी १० वाजता संरक्षण दलाच्या हेलिकॉप्टरने त्यांचे पोहरादेवी येथे आगमन होणार आहे. येथे ते संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीचे आणि जंगदबा देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर ‘बंजारा विरासत’, नंगारा वास्तूसंग्रहालयाचे लोकार्पण करणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा विदर्भ दौरा आहे. दरम्यान अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले महायुती सरकारमधील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून शनिवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे होत असलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.