पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचा दावा भाजपाकडून नेहमीच केला जातो. दरम्यान, यासंदर्भात आता इंडिया टुडेचा एक सर्वे पुढे आला आहे. भारतातील आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेतून करण्यात आला आहे. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत लोकांना काय वाटतं? तसेच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? हेदेखील या सर्वेतून पुढे आलं आहे. ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत हा सर्वे करण्यात आला.
हेही वाचा – आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोणाची येणार सत्ता? जनतेचा पाठिंबा नेमका कोणाला? जाणून घ्या
भारतातील लोकप्रिय पंतप्रधान कोण?
इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेतून ४७ टक्के लोकांनी पीएम मोदींना आतापर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान म्हटले आहे. तर १६ टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयींना आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे म्हटलं आहे. तसेच १२ टक्के लोकांनी इंदिरा गांधी यांना, ८ टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांना आणि ४ टक्के लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं म्हटलं आहे.
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण?
देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? याबाबत विचारण्यात आलं असता, ३९.०१ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे म्हटलं आहे. तर या सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १६ टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा – कमल हासन यांची स्वतःचा पक्ष वाचविण्यासाठी धडपड; पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देत आघाडीत सहभागी
पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण होणार?
दरम्यान, पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्नही या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. यामध्ये २६ टक्के लोकांनी अमित शाह यांना आपली पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांनाही २५ टक्के लोकांची पसंती आहे. तर या सर्वेक्षणात १६ टक्के लोकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून योग्य राहतील, असं म्हटलं आहे.