दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान (५ फेब्रुवारी) होत आहे. काही दिवसांपासून दिल्लीच्या प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात अमृतस्नान करण्यासाठी पोहोचले. एखाद्या राज्यात मतदान होत असताना पंतप्रधान मोदी हे एखाद्या दौऱ्यावर जाण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही मतदानाच्या दिवशी किंवा प्रचार थांबल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी केलेले दौरे गाजले आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी पंतप्रधान मोदींनी केलेल्या दौऱ्यावर काँग्रेसने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान मोदींची कृती आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काय झाले?
२०१४ च्या सालच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाचा दौरा केला होता. १७ व्या शतकात या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार केले होते. त्या वर्षी भाजपाचा प्रचार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाभोवती फिरत होता. लोकसभेनंतर काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडली.
जानेवारी २०१४ मध्ये सांगली येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वराज्याची लढाई लढताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. महाराष्ट्राच्या या भूमीत स्वतंत्र भारताचे चित्र रंगवले गेले. ३५० वर्षांपूर्वी राष्ट्रनिर्माणाची पहिली प्रयोगशाळाही या महाराष्ट्राच्या भूमीत निपजली. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ जागा जिंकत बहुमताने सरकार स्थापन केले. तीन दशकांनंतर संसदेत एकाच पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते. ५४३ खासदारांपैकी एनडीएचे एकूण ३३६ खासदार संसदेत होते.
२०१९ ची लोकसभा निवडणूक
२०१९ साली सात टप्प्यांत लोकसभेची निवडणूक झाली. यावेळी भाजपाच्या प्रचारात नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून प्रचारात उतरले होते. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी देशभरात त्यांनी १४२ जाहीर सभा घेतल्या. प्रचार संपल्यानंतर १९ मे रोजी उत्तराखंडच्या केदारनाथ येथील गुहेत त्यांनी १७ तास ध्यानधारणा केली. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे ४८ तास कोणत्याही प्रचार किंवा राजकीय कृतीवर बंदी असते. मात्र, या काळात पंतप्रधान मोदींनी धार्मिक भावनेचा वापर करून मतदारांवर प्रभाव टाकला, असा आरोप विरोधकांनी केला होता.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाने २०१४ पेक्षाही अधिक जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपाला तब्बल ३०३ जागा मिळाल्या. तर, एनडीएची बेरीज ३५२ एवढी होती.
२०२४ ची लोकसभा निवडणूक
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’, अशी घोषणा भाजपाकडून देण्यात आली होती. लोकसभेचा सात टप्प्यांतील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ४५ तासांची ध्यानधारणा केली. ३० मे २०२४ रोजी पंतप्रधान मोदींनी रामेश्वर येथील स्मारकात प्रवेश करून ध्यानधारणेला सुरुवात केली. त्यानंतर शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी झाले.
मात्र, या निवडणुकीत भाजपाला मागच्या दोन निवडणुकांच्या तुलनेत फटका बसला. भाजपाचा आकडा घसरून तो २४० वर आला. मात्र, एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षांना घेऊन, त्यांनी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले. टीडीपीच्या १६ आणि जेडीयूच्या १२ जागा निवडून आलेल्या आहेत. एनडीएतील इतर पक्षांची संख्या मिळून खासदारांचा आकडा २९३ वर पोहोचतो.
विधानसभा निवडणूक
२०२४ मध्ये हरियाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी मतदान पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील पोहरा देवी येथे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बंजारा समाजातील महंताची भेट घेतली. विशेष म्हणजे हरियाणातही बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे.
११ नोव्हेंबर २०२४ रोजी झारखंड राज्यातील ४३ विधानसभा मतदारसंघांत पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या वडतळ येथे श्री स्वामीनारायण मंदिराच्या २०० व्या वर्धापनदिन सोहळ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी राजस्थानमध्ये विधानसभेचे मतदान होत असताना पंतप्रधान मोदींनी तेजस या लढाऊ विमानातून भरारी घेतली. बंगळुरूमधील संरक्षण दलाच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या HAL कंपनीला भेट दिली असताना त्यांनी ही भरारी घेतली. यावेळी त्यांनी देशी बनावटीच्या उपकरणांवर विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी २३ नोव्हेंबर रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. मथुरा हे शहर राजस्थानच्या शेजारी आहे, हे विशेष. याच भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संत मीराबाई यांच्या ५२५ व्या जयंतीमध्ये सहभाग घेतला. संत मीराबाई यांचा जन्म राजस्थानमध्ये झाल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केला. राजस्थानमधील भरतपूर व ढोलपूर हे दोन जिल्हे राजस्थानच्या सीमेला लागून आहेत. मथुरेच्या आसपासच्या जिल्ह्यांना ब्रज बेल्ट असल्याचे म्हटले जाते. हे दोन जिल्हेही त्यात येतात.
५ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यातील मा भामलेश्वरी मंदिराला भेट दिली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असताना पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील उलीहाटू गावाला भेट दिली. भगवान बिरसा मुंडा यांचे हे जन्मस्थान आहे. बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजात आदराचे स्थान आहे. उलीहाटू गावाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले.