भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष असून, त्यांना देशाचे संविधान बदलायचे आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून अगदी २०१४ ला नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आल्यापासून केला जातो. त्यांच्या या आरोपाला अधिक बळ मिळेल, अशी वक्तव्येदेखील भाजपाच्या स्थानिक ते देश पातळीवरच्या नेत्यांकडून आजवर वारंवार केली गेली आहेत. नरेंद्र मोदी सत्तेत येऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ते आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहेत. तर दुसरीकडे, या निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये ‘देशाचे संविधान’ या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
काही दिवसांपासून आपल्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधक करीत असलेल्या याच दाव्यांना फेटाळून लावण्याच्या प्रयत्न केला आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले, तर ते देशाची घटना बदलतील, हा विरोधक करीत असलेला प्रचार खोटा असल्याचे ते प्रचारसभांमधून सांगत आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवीत असलेले भाजपाचेच उमेदवार अशी वक्तव्ये करताना दिसून आले आहेत की, एक मजबूत सरकारच देशाच्या घटनेमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणू शकते.
हेही वाचा : Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
“डॉ. आंबेडकर आले, तर तेदेखील देशाची घटना बदलू शकत नाहीत”
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी जर पुन्हा निवडून आले, तर ते घटना बदलतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधील पूर्णिया आणि गया या दोन्ही सभांमध्ये आपण घटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, “मी गरीब, मागासवर्ग आणि दलितांचा ऋणी आहे. कारण- मी स्वत: या पार्श्वभूमीमधून आलो आहे. तसेच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही ऋणी आहे. कारण- त्यांनी दिलेल्या घटनेमुळेच माझ्यासारखी व्यक्ती या पदापर्यंत पोहोचू शकली आहे.”
गयामधील सभेत ते म्हणाले, “केवळ मला शिव्या देण्यासाठी काँग्रेस आणि त्यांचे साथीदार संविधानाच्या नावावर खोटे बोलत आहेत. एनडीए घटनेचा आदर करते. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी आले, तर तेदेखील घटना बदलू शकत नाहीत. डॉ. आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिलेल्या या घटनेनेच मला पंतप्रधान केले आहे.”
विरोधक घटनेचे राजकारण करीत असल्याचा आणि ते संविधान दिन साजरा करण्याच्या विरोधात असल्याची टीकादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पुढे ते म्हणाले, “आमच्यासाठी देशाची घटना हा आस्थेचा विषय आहे.” देशाच्या घटनेच्या विरोधात असलेल्यांना शिक्षा करण्यासाठीच ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.
“काँग्रेसने वारंवार केला डॉ. आंबेडकरांचा अपमान”
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय घटनेवरून सुरू असलेल्या याच आरोप-प्रत्यारोपांना ‘सनातन धर्मा’वरून सुरू असलेल्या वादाशी जोडण्याचाही प्रयत्न केला. ते म्हणाले की, जे सनातन धर्माला नावे ठेवतात, त्यांनी लक्ष देऊन ऐकावं… संविधान सभेतील ८० ते ९० टक्के सदस्य हे सनातनीच होते आणि त्याच सनातनी सदस्यांनी इतके महान संविधान साकार करण्यासाठी डॉ. आंबेडकरांना पाठिंबा दिला.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमधील होशंगाबादमध्ये सभा घेतली. त्या सभेत मोदी म्हणाले, “एकीकडे काँग्रेसने डॉ. आंबेडकरांचा सातत्याने अपमान केलेला असला तरी आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. म्हणूनच आमच्या सरकारने डिजिटल पेमेंटसाठी वापरल्या जाणारे BHIM UPI हे नावही त्यांच्या नावावरून ठेवले.” पुढे त्यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले, “माझ्यासारखा एखाद्या गरीब घरातला मुलगा पंतप्रधान होताच काँग्रेसने अफवा पसरवायला सुरुवात केली की, देशाची घटना आणि लोकशाही धोक्यात येईल.” १२ एप्रिल रोजी बारमेर येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न द्यायला नकार देणाऱ्या आणि आणीबाणी लागू करणाऱ्या काँग्रेसला देशाच्या घटनेवर बोलण्याचा काहीएक अधिकार नाही.”
राहुल गांधींविरोधात भाजपाची निवडणूक आयोगाकडे धाव
एकीकडे नरेंद्र मोदींनी घटना बदलण्यावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांवर प्रत्यारोप करीत उत्तरे देण्याचा सिलसिला सुरू ठेवला आहे. तर, दुसरीकडे गेल्या सोमवारी भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात तक्रार करीत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निराधार आरोप करीत असल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात एकच भाषा लादायची असून, देशाची घटनादेखील बदलायची असल्याचा निराधार आरोप राहुल गांधी करीत आहेत, असे भाजपाचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांची ही वक्तव्ये फक्त लोकशाही तत्त्वाला काळिमाच फासत नाहीत, तर त्यामुळे देशात नागरी अशांतता आणि मतभेदही निर्माण होऊ शकतो, असा आरोप भाजपाने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
घटना बदलण्याबाबत भाजपाच्या उमदेवारांचीच वक्तव्ये
मात्र, दुसरीकडे भाजपाचेच काही नेते घटना बदलण्याची वक्तव्ये वारंवार करीत आहेत. भाजपाचे मेरठमधील उमेदवार अभिनेता अरुण गोविल, नागौरचे उमेदवार ज्योती मिर्धा, यावेळी उमेदवारी न मिळालेले उत्तर कन्नडचे विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे आणि फैजाबादचे विद्यमान खासदार व उमेदवार लल्लू सिंह या सर्वांनी आवश्यक असल्यास घटनादेखील बदलण्याची भाषा केली आहे. भाजपाच्या एका नेत्याने हे मान्य केले आहे की, भाजपा घटनेमध्ये अशा प्रकारचे बदल घडवून आणू शकते, हे पटवून देण्यामध्ये विरोधकांना नक्कीच यश मिळत आहे. याचे कारण ३७० कलम रद्द करणे, समान नागरी कायदा लागू करण्याबाबतचे नियोजन करणे आणि एक देश, एक निवडणुकीच्या दृष्टीने पाऊल टाकणे या सगळ्या गोष्टी याआधीच भाजपाकडून केल्या गेल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या तरतुदीचा फेरविचार करण्याचा सल्ला दिल्यानंतर देशातून आलेल्या प्रतिक्रियादेखील भाजपाच्या लक्षात आहेत. भाजपा आणि आरएसएस देशाच्या घटनेशी एकनिष्ठ नसल्याचा आरोप पूर्वापार होत आला आहे. त्यामुळे अशा प्रकारची भीती लोकांमध्ये निर्माण करणाऱ्या आरोपांबाबत काहीतरी उपाय करणे गरजेचे ठरते. पुढे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले, “देशाची घटना बदलण्याच्या गोष्टीवर जर कोणता समाज आपलेपणाने बोलू शकेल, तर तो प्रामुख्याने दलितच असेल. कारण- देशाची घटना आणि डॉ. आंबेडकर या त्यांच्यासाठी अभिमानाच्या गोष्टी आहेत.”
आमच्या सत्ताकाळात अल्पसंख्याक सुखी
काँग्रेसबरोबरच त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीही असे म्हटले होते की, जर भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडी ४०० हून अधिक जागांवर निवडून आली, तर ते नक्कीच देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधींनी अलीकडेच वायनाडमध्ये झालेल्या सभेत असा आरोप केला होता, “भाजपा आणि आरएसएसला देशाची घटना नको आहे. त्यांना देशातील बाकी सगळ्या विचारधारा नष्ट करायच्या असल्याकारणाने लोकशाही पद्धतदेखील नको आहे.”
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गयामध्ये केलेल्या आपल्या भाषणात असा दावा केला, “भाजपा केंद्रात आणि विविध राज्यांमध्ये सत्तेत आहे. हा सत्ताकाळ देशासाठी सर्वोत्तम आणि शांततामय ठरला आहे.” भाजपा पुन्हा सत्तेत आली, तर अल्पसंख्याकांना हा देश सोडावा लागेल या विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “गेल्या २५-३० वर्षांपासून ते हेच पालुपद चालवीत आहेत की, भाजपा सत्तेत आली, तर देशाची घटना बदलेल. मात्र, दुसरीकडे देशातील अल्पसंख्याक भाजपा सरकारने दिलेले फायदे आणि लागू केलेल्या योजनांचा आनंद घेत प्रगती करीत आहेत.”