झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज चंपई सोरेन यांच्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. याशिवाय आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आजच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.
झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव
चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १० दिवसांचा वेळ देण्यात आला होता. त्यानुसार आज झारखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता या विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्याची शक्यता आहे. झारखंड विधानसभेची एकूण संख्या ८१ असून झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला सध्या ४७ आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये सीपीआय-एमएल (लिबरेशन)च्या एका आमदाराचाही समावेश आहे.
हेही वाचा – काँग्रेस-समाजवादी यांच्यात अजूनही अंतिम तोडगा नाही, आरएलडीचे नेते अस्वस्थ; वाचा उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?
उत्तराखंड विधानसभेच्या चार दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात
उत्तराखंड सरकारने ‘समान नागरी कायद्या’चा मसुद्याला शुक्रवारी मान्यता दिली होती. हा मसुदा आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या चार दिवसीय विशेष अधिवेशनात पटलावर मांडला जाण्याची शक्यता आहे. उत्तराखंड विधानसभेत हे विधेयक पारीत झाले तर स्वातंत्र्य भारताच्या इतिहास समान नागरी कायदा लागू करणारे उत्तरखंड हे पहिले राज्य असेल. महत्त्वाचे म्हणजे गोव्यात पोर्तुगीजांच्या काळापासून समान नागरी कायदा लागू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात लग्न, घटस्फोट आणि संपत्तीचे मुलांमध्ये होणारे विभाजन अशा गोष्टी होतच असतात. लग्नाचं वय, किती लग्ने करावीत, संपत्तीचे विभाजन मुलगे, मुली किंवा विधवा पत्नी यांच्यामध्ये नेमके कसे व्हावे, याविषयी सर्व धर्मियांसाठी एकच नियम लागू करणं, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देतील. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रेचं आमंत्रणच नाही,’ अखिलेश यादव यांच्या विधानानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण
आपच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका आपने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ही स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयच्या या आदेशाविरोधात आपने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे पार पडेल. ३० जानेवारी रोजी चंदीगडमध्ये महापौरपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पीठासीन अधिकाऱ्यांनी ८ मते रद्द केल्याचा आरोप आप आणि काँग्रेसकडून करण्यात आला होता. यासंदर्भातील एक व्हिडीओदेखील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.
चार राज्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशा या चार राज्यांतील विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार असून केरळ आणि उत्तर प्रदेश विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होईल.