गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान ५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशाच काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप, टीका टीपणी सुरू आहे. दरम्यान, काँग्रेस नेते माझ्याबद्दल नेहमी अपशब्द बोलतात. मात्र, त्यांनी आजपर्यंत कधीही माफी मागितली नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. गुजरातमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा – “मोदी कुत्र्यासारखे मरतील, मोदी हिटलरसारखे…”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
काँग्रेस नेते सातत्याने माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. मला अपमानास्पद बोलतात. मला त्याचे कधीच दुखं वाटत नाही. मात्र, मला आर्श्चय या गोष्टीचं वाटतं की काँग्रेस नेते अशा विधानासांठी कधीही माफी मागत नाहीत. आजपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने अधिकृतपणे माझी माफी मागितलेली नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. रागाच्या भरात कोणाकडूनही चूक होऊ शकते, हे मी समजू शकतो. मात्र, त्यानंतर माफी देखील मागता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
मल्लिकार्जुन खरगेंकडून मोदींची रावणाशी तुलना
अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे झालेल्या प्रचारसभेत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘रावण’ असा उल्लेख केला होता. “मोदी सगळीकडे दिसतात. महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का?,” असा सवाल खरगे यांनी केला होता.