ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, शनिवारी घोडबंदर येथील कासारवडवली भागात महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी ठाणे पोलिसांचा सुमारे दोन हजार पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मैदान परिसरात तैनात करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे पथक देखील येथे तैनात असेल. तसेच, अतिमहत्त्वाचे व्यक्ती, जिल्ह्यातून महायुतीतील हजारो कार्यकर्ते, लाभार्थी महिला सभास्थळी येणार असल्याने वाहन तळाची सुविधा करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाने येथे भव्य मंडप उभारला आहे. अवजड वाहनांमुळे कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी २४ तास अवजड वाहनांना ठाणे शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. शुक्रवारी सकाळपासून बंदोबस्त कशा पद्धतीने असेल याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. तर, कासारवडवली गाव, घोडबंदर रोड परिसर ‘तात्पुरता रेड झोन’ (ड्रोन उडविण्यास बंदी) घोषित करण्यात आला आहे.
असा असेल बंदोबस्त
पंतप्रधान यांच्या कार्यक्रमासाठी ठाणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. यामध्ये चार अपर पोलीस आयुक्त, नऊ पोलीस उपायुक्त, १६ साहाय्यक पोलीस आयुक्त, ६३ पोलीस निरीक्षक, १७८ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, १११० पुरुष अंमलदार आणि ३३६ महिला अंमलदार, शीघ्र कृती दलाचे पथक असा सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा असेल. याशिवाय राज्य गुप्तचर विभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक पथकाचे कर्मचारी आणि अधिकारीही तैनात असतील.
हेही वाचा >>> ठाणे महापालिका मुख्यालय इमारत भुमीपुजन वादात; भुमीपुजनास काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोध
वाहतूक बदल असे आहेत
●अवजड वाहनांना शहरात २४ तासांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच टायटन रुग्णालयाजवळून डी-मार्टच्या दिशेने सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना टायटन रुग्णालय येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने टायटन रुग्णालय आणि डी-मार्टच्या दिशेने जाण्यासाठी ओवळा सिग्नल येथून मुख्य रस्त्याने कासारवडवली, आनंदनगर, वाघबीळ पुलाखालून इच्छित स्थळी जातील.
●वाघबीळ नाका येथून ओवळा येथे सेवा रस्त्याने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाघबीळ नाका, सिग्नल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने वाघबीळ नाका येथून आनंदनगर व कासारवडवलीकडे जाण्यासाठी टीजेएसबी बँक चौक, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क मार्गे इच्छित स्थळी जातील. किंवा ही वाहने वाघबीळ नाका कडून ओवळा कडे जाण्यासाठी वाघबीळ पूलाखालून मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील.●टायटन रुग्णालय ते डी-मार्ट सेवा रस्ता, वाघबीळ नाका ते आनंदनगर नाका येथे वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd