गुजरात निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सत्ताधारी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षा ( आप ) कडून जोरदार प्रचार केला जातो आहे. आप पक्षाकडून आरोग्य, शिक्षण, वीज या विषयांवर प्रचारात भर दिला जात आहे. पण, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. गुजरातमधील सरकारने गेल्या २० ते २५ वर्षात रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज आणि पाणी या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहेगाम, बावळा, पालनपूर आणि मोडासा येथील सभांना संबोधित केलं. तेव्हा पंतप्रधानांनी आरोग्य, वीज, शिक्षण या विषयांवर भाषणात भर दिला. गेल्या २० वर्षात सरकारने शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देण्याचं काम केलं, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
“पाण्याएवढीच वीज महत्वाची आहे. विजेशिवाय विकास शक्य नाही. तुमच्यापैकी कोणीही विजेशिवाय मोबाईल फोन वापरू शकणार नाही. तुम्ही बघितलेच असेल की संपूर्ण मोढेरा गाव (मेहसाणा जिल्हा) आता छतावरील सौरऊर्जेवर कसे चालत आहे. ते त्यांच्या गरजेनुसार वीज वापरत आहेत आणि अतिरिक्त वीज सरकारला विकतात. मला ही प्रणाली संपूर्ण गुजरातमध्ये लागू करायची आहे. या प्रणालीअंतर्गत तुम्ही सौर पॅनेलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकून पैसे कमवू शकता,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
हेही वाचा : “नोटबंदी, जीएसटी धोरणे नाही, तर लहान व्यापाऱ्यांना…”, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र
दहेगाम येथे पंतप्रधान मोदींनी सांगितलं, “एक काळ होता, जेव्हा निवडणुकीत भ्रष्टाचार, जातिवाद, घराणेशाही असे मुद्दे असायचे. आता रस्ते, वीज आणि पाणी हे प्रश्न मोठे झाले आहेत. पण, गेल्या २० वर्षात गुजरातने या मूलभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्याने देशातील आघाडीचे राज्य म्हणून उदयास आलं आलं आहे.”
गुजरातमधील शिक्षण क्षेत्राबद्दलही मोदी यांनी कौतुक केलं. “२० ते २५ वर्षापूर्वी गुजरातमधील शिक्षणाचे बजेट १६०० कोटी रुपये होते. आज ते ३३ हजार कोटींवर पोहचले आहेत. अनेक राज्यांचे संपूर्ण बजेटही इतके नाहीत. गांधीनगर उच्च माध्यमिक शाळा, अभियांत्रिकी आणि डिप्लोमा महाविद्यालये आणि बाल विद्यापीठ, न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ, पंडित दीनदयाल उर्जा विद्यापीठ, गुजरात राष्ट्रीय कायदा यासारख्या विद्यापीठांच्या दृष्टीने शिक्षणाचे मोठे केंद्र बनत आहे,” असे मोदी यांनी सांगितलं.
“गुजरातमधील कुपोषणावर सरकारने दोन दशके काम केले आहे,” असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं, “भाजपाच्या ‘डबल इंजिन सरकार’ने कुपोषणावर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा फायदा आदिवासी महिलांना फायदा झाला. तसेच, गर्भधारणेदरम्यान महिलांना पोषण सुनिश्चित करण्यासाठी, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा गुजरातमधील तीन लाखांहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.