कर्नाटकातील बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चांगलेच बदनाम झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा फायदा उठविण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान मोदी हे उद्या पाचव्यांदा राज्याच्या दौऱ्यावर येत असून, विविध विकास कामांचा पायाभरणी समारंभ किंवा उद्घाटने त्यांच्या हस्ते पार पडतील.

कर्नाटकताली सत्ता कायम राखण्यावर भाजपने भर दिला आहे. कर्नाटकात गेले काही वर्षे प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताबदल होतो. २०१८ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. पण हे सरकार काँग्रेस व जनता दलातील आमदार फुटल्याने कोसळले होते. येडियुरप्पा यांना बदलून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदी संधी देण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला दिसत नाही. कारण भाजपचे जुने नेते बोम्मई यांना साथ देत नाहीत. त्यातच पक्षांतर्गत हेवेदावे मोठ्या प्रमाणावर आहेत. पुन्हा सत्ता मिळाल्यास बोम्मई हे मुख्यमंत्रिपदी कायम राहणे काही नेत्यांना नको आहे.

हेही वाचा – रेल्वेने पुण्याला जाताय.. मग हे वाचाच!

बोम्मई सरकारवर ४० टक्के दलालीचा आरोप केला जातो. ठेकेदारांच्या संघटनेने तसा आरोप केला होता. त्यानंतर एका ठेकेदाराने मंत्र्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावरून ईश्वरप्पा या ज्येष्ठ मंत्र्याला घरी बसविण्यात आले. भ्रष्टाचाराचा आरोप पक्षासाठी तापदायक ठरू शकतो हे लक्षात घेऊनच पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च कर्नाटकात लक्ष घातले आहे. १२ जानेवारीपासून उद्या १२ मार्च या दोन महिन्यांच्या काळात मोदी यांचा पाचवा दौरा असेल.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी दोषी? अहवाल सादर होऊनही कारवाई नाही

मोदी हे उद्या मंडयाला भेट देणार आहेत. हा भाग म्हैसूरू भागात मोडतो. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे वर्चस्व असलेला आणि वोकिलिंग समाजाचे प्राबल्य असलेल्या या पट्ट्यात भाजपची तेवढी ताकद नाही. विधानसभेच्या ३२ जागा असलेल्या या भागावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. या पट्ट्यात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलातच लढत होते. म्हैसूरू, हसन आदी पट्ट्यात हातपाय रोवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय हुबळी-धारवाड या भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पट्ट्यात ते भेट देणार आहेत. बेळगावी, हुबळी, धारवाड या उत्तर कर्नाटक पट्ट्यावर भाजपची सारी मदार आहे. हिजाब वादातून उत्तर कन्नडा, उडपी आदी किनारपट्टी भागातही भाजपला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा भाजपला भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तगून नेणार का, हा खरा प्रश्न असेल.