संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार नव्हे अजित पवार हेच खरे नेते, असे चित्र राज्य भाजपकडून रंगविले जात असले तरी शिर्डीतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांची दखल घ्यावी लागली.

राज्यातील दौऱ्यात मोदी हे इंडिया आघाडीवर टीका करतील हे अपेक्षितच होते. मोदी यांनी नेहमीप्रमाणे आधीच्या यूपीए सरकारवर टीकाटिप्पणी केली. त्यानंतर त्यांनी थेट नाव न घेता दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्रिपद भूषविलेल्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल केला. मोदी यांचा रोख माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे. शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेले निर्णय किंवा शेतकऱ्यांना करण्यात आलेली मदत व आपल्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतमालाल दर याची तुलना केली. मोदी यांनी शरद पवार यांनाच आपल्या भाषणात लक्ष्य केले होते.

हेही वाचा… अजित पवार यांना बारामती बंदी? मराठा क्रांती मोर्चाची मागणी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेते असे चित्र देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आदी सारे भाजपचे नेते रंगवीत आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांच्या पाठीशी असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो. पण मोदी यांनी राज्याच्या दौऱ्यात शरद पवार यांना लक्ष्य केले. अजित पवार यांच्या बंडानंतरही शरद पवार यांची जनमानसात ताकद कायम असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे अहवाल आले असावेत. अन्यथा मोदी यांनी शरद पवार यांना शेतीच्या मुद्द्यावर लक्ष्य केले नसते, असे मानले जाते.

हेही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राधाकृष्ण विखेंकडून महाराष्ट्रातील दुष्काळावर भाष्य, म्हणाले, “आज…”

जातीच्या मुद्द्याला स्पर्श नाही

काँग्रेस व इंडिया आघाडीच्या अन्य घटक पक्षांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जातीच्या आधारावर समाजात फूट पाडण्याचा कारस्थान सुरू असल्याचा आरोप मोदी यांच्याकडून वारंवार केला जातो. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय पेटला आहे. जरांगे पाटील यांच्या पुन्हा सुरू झालेल्या उपोषणामुळे सत्ताधाऱ्यांची झोप उडाली आहे. शिर्डीतील भाषणात मोदी यांनी मात्र जातीच्या मुद्द्याला काहीच स्पर्श केला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi had to take notice of sharad pawar even after the split in ncp print politics news asj
Show comments