मुंबई : घरोघरी जाऊन महायुतीचा संकल्प व जाहीरनाम्यातील आश्वासने जनतेपर्यंत पोहोचवावीत. मतदारांचे मन जाणून घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन करावे. त्याच्याशी वाद न घालता आणि त्याचा मुद्दा खोडून न काढता प्रेमाने संवाद साधावा आणि हात जोडून विनंती करावी, अशा अनेक सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मतदान केंद्र (बूथ) प्रमुखांना शनिवारी दिल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी यांनी राज्यातील सुमारे लाखभर बूथप्रमुखांशी शनिवारी ऑनलाइन संवाद साधून चर्चा केली आणि अनेक सूचना दिल्या. मी राज्यातील अनेक भागांमध्ये गेलो होतो. राज्य सरकारच्या अडीच वर्षांतील कामगिरीने जनता समाधानी आहे. हे सरकार कायम राहिले पाहिजे, अशी लोकांची भावना आहे. मराठी गौरवाला वाढविण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही नुकताच देण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने मात्र अनेक प्रकल्पांची कामे थांबविली. पण केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जनतेला मिळत आहे. देशभरात तीन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. डबल इंजिन सरकार विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी वेगाने काम करेल, असा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन मोदी यांनी बूथप्रमुखांना केले. राधानगरी येथील विनोद कुलकर्णी, कळवण येथील ललिता कुवर आदी बूथप्रमुखांनी मोदींशी संवाद साधला.

हेही वाचा >>> मोदींकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने केव्हाही मध्यावधी निवडणुका शक्य; काँग्रेसचे पवन खेरा यांचे भाकित

सूचना काय?

● मतदारांच्या घरी बूथक्रमांक व अन्य तपशिलाची स्लिप पोहोचविली आणि महायुतीला मत देण्यास सांगितले, म्हणजे आपले काम झाले, असे नाही. एवढ्यावर न थांबता मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मन जाणून घ्यावे.

● मतदारांच्या काही शंका, गैरसमज असतील तर ते दूर करावेत.

● मन परिवर्तित करून मतदानास आवाहन करावे.

● निवडणुकीतील मुद्द्यांवर भाजपची भूमिका व संकल्प काय आहे, हे समजावून सांगावे.

● मतदारांच्या घरी जाण्याआधी त्यांच्या समस्या काय आहेत, याची माहिती घ्यावी. त्या दूर करण्यासाठी सरकारने काय केले व करणार आहे, याची माहिती त्यांना द्यावी.

● भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दे मोबाइलमध्ये असावेत.

● भाजप व महायुतीचा प्रत्येक मतदार महायुतीच्या उमेदवाराला मतदान करेल, याची काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi interacted online with around one lakh booth chiefs in maharashtra ahead of assembly polls print politics news zws