मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील विविध राज्यांचे मुख्य सचिव आणि सचिवांना योगाभ्यासाचे धडे शिकवणार आहेत. तसेच या अधिकाऱ्यांसमवेत देश- राज्यातील विविध विषयांवर चर्चाही करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत उद्यापासून मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत विकसित भारतच्या दृष्टीने सहकारी संघराज्यवादाचे तत्त्व प्रत्यक्षात आणण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाने प्रेरित, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारीला प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील सबंध, भागीदारीतील प्रकल्प, पायाभूत सुविधा, प्रशासन अशा विविध विषयांवर बैठकीत विचारमंथन होणार आहे. अशा प्रकारची पहिली परिषद जून २०२२ मध्ये धर्मशाला येथे झाली होती. या तीन दिवसीय परिषदेत निती आयोग, केंद्र सरकारचे प्रतिनिधी, मुख्य सचिव आणि सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सुमारे २०० हून अधिक लोकांचा सहभाग असेल. या परिषदेत केंद्राच्या विविध योजनांची राज्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी, सौर उर्जा निर्मितीवर भर आदी विषयांवरही विचारमंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा-राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त

विशेष म्हणजे या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस अधिकाऱ्यांसमवेत राहणार असून सर्वांना योगाभ्यासाचे धडेही शिकवणार आहेत. पंतप्रधान मोदी या अधिकाऱ्यांसमवेतच न्याहारी. जेवण घेणार असून प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिव आणि अधिकाऱ्यंशी थेट संवाद साधणार आहेत. या परिषदेसाठी राज्यातून मुख्य सचिव सुजाता सौनिक, नियोजन विभागाचे अप्पर मुख्यचिव राजगोपाल देवरा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि उर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला आदी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi interaction with chief secretaries across country for two days print politics news mrj