मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा धडाका राज्यात ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. चार दिवसांत मोदींच्या ९ प्रचारसभांचे नियोजन करण्यात आले असून आणखीही काही सभांचे नियोजन करण्याचा प्रयत्न आहे. मोदींच्या सभांचा आरंभ उत्तर महाराष्ट्रातून होणार असून ८ नोव्हेंबरला धुळे व नाशिकला सभा होतील. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी अकोला, चिमूर, १३ नोव्हेंबर रोजी सोलापूर, कोल्हापूर आणि १४ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई व मुंबई याठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रत्येकी १५-२० सभा होणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५० हून अधिक प्रचारसभा राज्यात घेणार आहेत.
खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा
मुंबई : शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एन. सी. (५१) यांच्या विरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७९ आणि ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई सेंट्रल येथील गिल्डर लेन येथे २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरताना सावंत यांनी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत शायना एन. सी. यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, नागपाडा पोलिसांनी अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.
© The Indian Express (P) Ltd