PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जानेवारी यादिवशी मन की बातचा ११८ वा भाग सादर केला. मन की बात हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सादर होतो. मात्र पुढच्या रविवारी २६ जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे आजच मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधन केलं. या मन की बातमधले महत्त्वाचे पाच मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.
रामलल्ला मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वर्षपूर्ती
अयोध्येतील राम मंदिरात मागील वर्षी २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला तिथीनुसार नुकतंच एक वर्ष झालं. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याचा उल्लेख केला. राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा ज्या तिथीला पार पडला ती तिथी या वर्षी अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरी केली गेली. त्यामुळे आपल्या देशाची परंपरा आपण अशीच सांभाळू असा विश्वास मला वाटतो. यानंतर त्यांनी स्टार्ट अप इंडियाचा मुद्दाही उपस्थित केला.
स्टार्ट अप इंडियाबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
स्टार्ट अप इंडियाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागच्या ९ वर्षांत जेवढे स्टार्ट अप्स निर्मिले गेले आहेत त्यातल्या निम्म्याहून अधिक स्टार्ट्स अप्सची संख्या २ टायर आणि ३ टायर शहरांमध्ये आहे. मला खात्री आहे की हे ऐकून माझ्यासह सगळ्याच भारतीयांना आनंद झाला असेल.
राष्ट्रीय मतदार दिवस याबाबत काय म्हणाले मोदी?
२५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस अर्थात नॅशनल व्होटर्स डे आहे. या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. संविधानाच्या निर्मात्यांनी संविधानात निवडणूक आयोगाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. तर निवडणूक आयोगाने आपल्या मतदानाच्या प्रक्रियेला आधुनिक करण्याचं आणि बळकट करण्याचं काम केलं आहे.
कुंभमेळ्याबाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मोदी मन की बातमध्ये म्हणाले, प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरु झाला आहे. कुंभमेळा हा उत्सव विविधेतली एकता काय? हे दाखवतो. तसंच कुंभमेळा हा भारताला परंपरेच्या सूत्रात बांधण्याचं काम करतो. या कुंभमेळा उत्सवात युवकही मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत आणि ही समाधानाची बाब आहे.
सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख
२३ जानेवारी या दिवशी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. हा दिवस आपण पराक्रम दिवस म्हणून साजरा करतो. त्यांच्या शौर्याची गाथा आपल्या देशाशी जोडली गेली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. सुभाषचंद्र बोस हे इंग्रजांना चकमा देऊन ज्या घरातून निघून गेले होते त्या घराला मी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दूरदृष्टी होती. शौर्य तर त्यांच्या रक्तात भिनलेलं होतं. तसंच ते एक उत्तम प्रशासकही होते असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.