मुंबई : तोडा, फोडा व राज्य करा, भ्रष्टाचार व वंशवाद ही देशातील राजकारणाची नीती होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नीती बदलून विकासाभिमुख केली. राजकारणाचा पोत बदलला आणि विकासाचे राजकारण करीत सर्वांगीण प्रगती साध्य केल्याने देशातील २५ कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या बाहेर निघाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. जागतिक नाणेनिधीच्या अहवालाचा दाखला देत व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलबारहिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगलप्रभात लोढा यांनी नड्डा यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबर गरवारे क्लब येथे बुधवारी बैठक आयोजित केली होती. यावेळी वकील, सीए, व्यावसायिक आदी मान्यवरांपुढे देशाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची आकडेवारी सादर करीत नड्डा म्हणाले, बँक खात्यांची संख्या तीन कोटींवरून मोदींच्या कार्यकाळात ५३ कोटींवर गेली. शासकीय विविध योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. देशातील ८० कोटी जनतेला दरमहा पाच किलो गहू, तांदूळ, डाळ व अन्य शिधा मोफत देण्यात येत असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

ते पुढे म्हणाले, की गरीबांसाठी चार कोटी घरे उपलब्ध करून देण्यात आली असून आणखी तीन कोटी घरे बांधण्यात येत आहेत. सुमारे ११ कोटी शौचालये बांधण्यात आली असून उज्ज्वला योजनेत ११ कोटी गॅस सिंलेंडर देण्यात आले आहेत. आयुष्मान योजनेचा लाभ कोट्यवधी नागरिकांकडून घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसकडून शहरी नक्षलवाद्यांना प्रोत्साहन

काँग्रेस ही तुकडे तुकडे गँग असून शहरी नक्षलवाद्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून काँग्रेसला धडा शिकवावा. काँग्रेसकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जाते आणि ओबीसींबाबत जिव्हाळा असल्याचे दाखविले जाते. पण काँग्रेस कार्यकारी समितीमध्ये किती ओबीसी नेत्यांना स्थान देण्यात आले आहे, असा सवाल नड्डा यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi politics towards development says bjp president jp nadda print politics news zws