यवतमाळ : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच राजकीय पक्षांची विविध समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या अनुषंगाने वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुतीने राज्यातील बंजारा समाजाच्या ध्रुवीकरणावर भर दिला आहे.
पोहरादेवी (ता. मानोरा) बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो बंजारा भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी नवरात्र, रामनवमी आदी सणांच्या निमित्ताने बंजारा समाज बांधव एकत्रित येतात. ही बाब ओळखूनच मंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शवणारे पाच मजली नंगारा वास्तुसंग्रहालय बांधले. त्यांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तेथे येत आहेत. या निमित्ताने राज्याभरातील बंजारा समाजाला महायुतीच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न आहे.
धर्मगुरूंच्या शब्दाला महत्त्व
बंजारा समाजात धर्मगुरू, महंत यांचा शब्द प्रमाण मानला जातो. शिवाय बंजारा समाजावर माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक, पुसद येथील नाईक घराणे आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा पुसद आणि दिग्रस या दोन्ही बंजाराबहुल विधानसभा मतदारसंघावर प्रभाव आहे. पोहरादेवी हे या दोन मतदारसंघाच्या मध्यस्थानी आहे. त्यामुळे येथे होत असलेल्या पंतप्रधानांच्या सभेचा प्रभाव परिसरातील मतदारांवर पडेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड तर पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) इंद्रनील नाईक विद्यमान आमदार आहेत. आगामी निवडणुकीत या दोन्ही आमदारांना पंतप्रधानांच्या सभेचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाच्या या एकत्रीकरणाचा फायदा केवळ यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर बंजाराबहुल इतर जिल्ह्यांमध्येही होईल, याची काळजी महायुतीने पंतप्रधानांच्या या सभेच्या निमित्ताने घेतली आहे.
हेही वाचा : राहुल गांधींची भेट, पवारांचे डावपेच; साखरपट्टा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीची रणनीती काय?
बंजारा मतदार निर्णायक
यवतमाळ जिल्ह्यात बंजारा मतदारांचा कौल नेहमीच निर्णायक ठरत आला आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय कोणीही पुसद आणि दिग्रस मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करू शकत नाही. आतापर्यंत या समाजाने नाईक कुटुंबीय आणि संजय राठोड यांच्या पाठीशी एकसंघपणे शक्ती उभी केल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यावेळी महायुतीने मराठा, कुणबी समाजाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी दिग्रससह कारंजा, मानोरा, मंगरूळपीर आदी बंजाराबहुल तालुक्यात महायुतीच्या उमेदवारास अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले होते. या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी पंतप्रधानांना पोहरादेवी येथे निमंत्रित करण्यात आले आहे.