PM Narendra Modi RSS headquarters Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दीक्षाभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देतील. पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मोदींनी अनेकदा नागपूर आणि नजीकच्या परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. मात्र, संघ मुख्यालय किंवा रेशीमबागच्या स्मृती मंदिराकडे त्यांचा ताफा कधीही वळला नाही. २०१४ नंतर संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची मोदींची ही पहिलीच वेळ असेल. विशेष बाब म्हणजे यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी आरएसएसच्या मुख्यालयाला भेट दिलेली नाही. दरम्यान, मोदींचा नागपूर दौरा हा राजकीय नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
मात्र, असं असलं तरी पंतप्रधानांच्या या दौऱ्याकडे भाजपा आणि संघ यांच्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचं भूमिपूजन होईल. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हेदेखील असतील. त्यानंतर पंतप्रधान दीक्षाभूमीला भेट देतील. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.”
आणखी वाचा : ‘गद्दार’वरून उत्तरप्रदेशातही वाद, सपा विरोधात भाजपा आक्रमक; नेमकं प्रकरण काय?
मोदींनी संघ मुख्यालयाला कधी भेट दिली होती?
हेडगेवार स्मृती मंदिरात आरएसएसचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि संघाचे दुसरे सरसंघचालक एम. एस. गोळवलकर यांची स्मारकं आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी सप्टेंबर २०१२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. दिवंगत आरएसएस प्रमुख के. एस. सुदर्शन यांच्या अंत्यविधीला ते नागपूरमध्ये उपस्थित होते. जुलै २०१३ मध्येही मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी ते भाजपाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू होत्या. नरेंद्र मोदी कित्येक वर्षं संघाचे प्रचारकही राहिलेले आहेत.
मोहन भागवत आणि पंतप्रधान एकाच व्यासपीठावर
२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली नसली तरी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याबरोबर ते अनेकदा एकाच व्यासपीठावर दिसून आले. त्यामध्ये गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाचाही समावेश आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काहीसा दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामागचं कारण म्हणजे भाजपाला आता संघाबरोबर हातमिळवणी करण्याची आवश्यकता नाही, असं विधान जे. पी. नड्डा यांनी केलं होतं.
लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
नड्डा यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नाराज झाले होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचारही केला नव्हता, असं सांगितलं जातं. त्यामुळेच भाजपाला या निवडणुकीत मोठा फटका बसला आणि स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. दरम्यान, संघ आणि भाजपामध्ये पडलेली दरी दोन्ही बाजूंनी वेळोवेळी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मात्र संघानं दिलेल्या सूचनांचं भाजपाकडून काटोकोरपणे पालन केलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
मोदींकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक
दरम्यान, फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या तीन दिवसांच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं होतं. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी संघाची तुलना वटवृक्षाशी केली होती. “महाराष्ट्रात मराठी भाषकानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हा संघ आता वटवृक्ष झाला आहे. वेदापासून ते विवेकानंदपर्यंतचे विचारांचा यज्ञ संघाकडून नवीन पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे. माझ्यासह लाखो लोकांना संघानं देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली आहे”, असं पंतप्रधान म्हणाले होते. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीतही मोदींनी संघाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यावर संघाचा काय परिणाम झाला याबद्दल पंतप्रधानांनी सांगितलं होतं.
हेही वाचा : उपसभापती निवडीचे काय आहेत नियम? राज्यघटना काय सांगते? भाजपाची कोंडी होणार का?
संघाची कोणती शिकवण पंतप्रधानांना आवडली?
“लाखो लोक संघाशी जोडलेले आहेत; परंतु संघाला समजून घेणं इतकं सोपं नाही. त्याच्या कार्याचं स्वरूप खरोखर समजून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे संघ तुम्हाला एक स्पष्ट दिशा देतो, ज्याला खरोखर जीवनाचा उद्देश म्हणता येईल. दुसरं म्हणजे राष्ट्र हेच सर्वस्व असून लोकांची सेवा करणं हे देवाची सेवा करण्यासारखं आहे, अशी संघाची शिकवण आहे. माझ्या माहितीनुसार संघ कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ समुदायाच्या पाठिंब्याद्वारे सुमारे १,२५,००० सेवा प्रकल्प चालवतात. त्याद्वारे मुलांना शिक्षण दिलं जातं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना चांगले संस्कार दिले जातात. सेवा प्रकल्प चालवणं हे काही छोटं काम नाही,” असं पंतप्रधान म्हणाले होते.
आरएसएसच्या पदाधिकाऱ्यानं काय सांगितलं?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “भाजपाबरोबरच्या चढ-उताराच्या संबंधांचा आम्ही जास्त विचार करीत नाहीत. संघ कधीही भाजपाच्या कारभारात हस्तक्षेप करीत नाही. कधी कधी ते आमच्याकडं सल्ला मागतात. त्यानुसार आम्ही त्यांना सल्ला देण्याचं काम करतो. काही वेळा ते आमचा सल्ला स्वीकारतात आणि अमलात आणतात; तर अनेकदा त्याकडे दुर्लक्षही करतात”.