नवी दिल्ली : विरोधी पक्ष नकारात्मक राजकारण करत असून त्यांना त्याबद्दल पश्चात्तापही होत नाही. गेल्या संसद अधिवेशनामध्ये विरोधकांनी माझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. विरोधकांनी पक्षापेक्षा देशहिताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेच्या आवारात पत्रकारांशी संवाद साधताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. विरोधकांनी संविधानाचे उल्लंघन करत पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा अडीच तास प्रयत्न केला. लोकशाहीमध्ये अशा प्रकारांना स्थान नाही, असे मोदी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला मोदींनी दिलेल्या उत्तरावेळी लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला होता.

हेही वाचा >>> अर्थ आकांक्षांना मुरड! विकासदराबाबत सावध अंदाज; कृषी, रोजगार, जागतिक अस्थिरतेचे अडथळे

विरोधकांच्या नकारात्मक राजकारणामुळे खासदारांचे नुकसान होत असल्याचे मोदी म्हणाले. २०१४नंतर काही खासदार पाच वर्षे राहिले तर काही दहा वर्षे पण, त्यांच्यापैकी अनेकांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडण्याची संधी मिळाली नाही. कारण विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाने संसदेचा वेळ वाया गेला. मतभेद असणे ही समस्या नसून विरोधकांची नकारात्मकचा देशाला घातक आहे. देशाला पुढे घेऊन जाणारा विचार त्यांनी केला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

संसदेत मंगळवारी एनडीए-३.० सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्याबद्दल मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प अमृतकाळातील स्वप्नांच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचा असेल. आमच्या सरकारच्या पाच वर्षांच्या योजनांचा आराखडा त्यातून मांडला जाईल. २०४७ मध्ये विकसित भारताच्या उद्देशपूर्तीसाठी या अर्थसंकल्पातून पाया घातला जाईल, असे मोदी म्हणाले.

मंत्र्यांना अशोक चव्हाण यांचे मार्गदर्शन

नवी दिल्ली: विरोधकांच्या प्रश्नांना थेट आणि स्पष्ट उत्तर देऊन निरुत्तर कसे करायचे याची चुणूक भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी राज्यसभेत दाखवून दिली. चव्हाण मंत्री नसले तरी, मंत्र्यांना प्रश्न विचारताना चव्हाणांनी मंत्र्यांच्या वतीने विरोधकांना ‘उत्तर’ दिले. चव्हाणांवर खूश होऊन सत्ताधारी सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांनी चव्हाणांना थांबवून त्यांना पुरवणी प्रश्न विचारण्याची सूचना केली.

राज्यसभेत जलजीवन मोहिमेसंदर्भात नवनियुक्त जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांना विविध प्रश्न विचारले गेले. गुजरातचे भाजपचे खासदार केसरीदेवसिंह झाला यांनी विचारलेल्या प्रश्नांना पाटील यांना थेट उत्तर देता आले नाही. या मोहिमेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे खासदार झाला म्हणत होते तर, गुजरातमध्ये सगळीकडे पाणी पोहोचवण्यात आल्याचा दावा पाटील करत होते. विरोधी खासदार जया बच्चन यांनी पाटील यांच्या उत्तरावर आक्षेप घेतला. ‘केसरीदेवसिंह झाला काय विचारत आहेत आणि पाटील काय उत्तर देत आहेत? पाटील यांनी प्रश्नांची उत्तरेच दिलेली नाहीत’, असे जया बच्चन म्हणाल्या.

विरोधकांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्याची पाटील यांनी उत्तरे दिली खरी पण, विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. गोंधळलेल्या पाटील यांची सभागृहनेते जे. पी. नड्डाही चौकशी करत असल्याचे पाहायला मिळाले. एका उत्तरानंतर सभापती धनखड, म्हणाले मंत्री म्हणून उत्तर देण्यात गती घेतली आहे. त्रोटक उत्तर देणे ही गोष्ट पहिल्या दिवशी होऊ होऊ शकते असे पाटील यांना उद्देशून म्हणाले.

प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनीही जलजीवन मोहिमेसंदर्भात प्रश्न विचारला. पण, हा प्रश्न विचारण्याआधी त्यांनी मंत्रीपदाच्या क्षमतेची चुणूक दाखवली. विरोधकांना उद्देशून चव्हाण म्हणाले की, घरोघरी पिण्याच्या पाण्याची योजना अनेक राज्यांमध्ये उत्तमरीत्या राबवली जात आहे. विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये ही मोहीम गतीने राबवली जात नसल्याबद्दल मतभेद आहेत. त्या संदर्भात झालेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. निधीपुरवठा ही मोठी समस्या होती पण, आता ९० टक्के निधी केंद्र सरकार पुरवते व १० टक्के राज्य सरकारला खर्च करावा लागतो!… चव्हाणांनी प्रश्न विचारता विचारता मंत्री पाटील यांचीच अप्रत्यक्ष ‘शाळा’ घेऊन टाकली. महाराष्ट्रात या मोहिमेअंतर्गत गतीने काम होत नसल्याचा मुद्दा चव्हाण यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi remarks criticising opposition alleging suppressing my voice print politics news ws
Show comments