गुजरात विधानसभेसाठी निवडणुका जाहीर झाल्या असून पहिल्या टप्प्याच्या मतदानाला १० दिवसांपेक्षा कमी कालावधी बाकी आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी सुरेंद्र नगरमध्ये जाहीर सभेत बोलताना काँग्रेसच्या आकौत दाखवण्याच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यावरूनही टीका केली.
यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते मधुसूदन मिस्री यांच्या ‘मोदींना औकात दाखवून देऊ’ या विधानावरून काँग्रेसवर निशाणा साधला. “निवडणुकीच्या प्रचारात विकासाचे मुद्दे असायला हवे. कोणी किती कामं केली? जनतेपर्यंत वीज आणि पाणी कोणी पोहोचवले? आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत. मात्र, काँग्रेसला माहिती आहे की या मुद्द्यांवर भाजपा वरचढ ठरेल, त्यामुळे ते विकासाच्या मुद्यावर बोलत नाहीत. ते मला मला नावं ठेवतात आणि औकात दाखवतो वगैरे भाषा वापरतात. हा त्यांचा अहंकार आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“काँग्रेस नेते राजघराण्यात जन्माला आले. मात्र, मी सामान्य कुटुंबात जन्म घेतला. माझी काहीही औकात नाही. मी जनतेचा सेवक आहे. काँग्रेस नेत्यांनी माझी ‘मौत का सौदागर’, ‘गंदी नाली का किडा’ अशी अनेक नावं ठेवली. मला माझ्या जातीवरून शिव्या देण्यात आल्या. आता ते म्हणतात आहे, की ‘मोदींना औकात दाखवून देऊ’. मला त्यांना एवढं सांगायचं आहे की माझी काहीही औकात नाही. त्यामुळे कृपया तुम्ही विकासावर बोला. लोकांना औकात दाखवण्याचे खेळ बंद करा”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. “मी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यात नर्मदेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मुख्यमंत्री असताना नर्मदा योजनेच्या कामानिमित्त मी अनेकदा याठिकाणी आलो होतो. मात्र, विचार करा ज्यांना भारतीयांना घरी बसवलं, ते आज पदयात्रा काढत आहेत. लोकशाहीत त्यांना यात्रा काढण्याच अधिकार आहे. मात्र, ज्या लोकांनी गुजरातला तहानलेलं ठेवलं, नर्मदेला गुजरातमध्ये येण्यापासून रोखलं, ज्यांच्यामुळे गेल्या ४० वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे, अशा लोकांबरोबर पदयात्रेत चालणं किती योग्य आहे. गुजरातची जनता त्यांना याची शिक्षा देईल”, अशी टीकाही त्यांनी केली.