नागपूर: महाराष्ट्रात मोदींचीपहिली प्रचारसभा ही विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात होत असून येथे भाजपचा नव्हे तर शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे मोदी यांनी या मतदारसंघाची निवड करण्यामागे नेमके कारण काय यावर राजकीय वर्तुळात तर्कवतिर्क लावले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून त्यांची पहिली जाहीर सभा ही रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान या गावी १० एप्रिलला होत आहे. विशेष म्हणजे रामटेकला भाजपचा उमेदवार रिंगणात नाही. तेथे शिंदे गटाचा उमेदवार आहे. या मतदारसंघाला खेटूनच नागपूर लोकसभा मतदारसंघ असून तेथे नितीन गडकरी हे पक्षाचे उमेदवार आहेत. पण तरीही मोदींनी नागपूर ऐवजी रामटेकची केलेली निवड अनेक चर्चेंना तोंड फोडणारी ठरली आहे.
हेही वाचा: ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरला, ‘या’ महिला नेत्याला दिली संधी
ह
काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार
रामटेक हा सेनेचा बालेकिल्ला आहे. सेना(एकसंघ)- भाजपयुतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला येत असल्याने येथून आतापर्यंत भाजप कधीच निवडणूक लढला नाही. सेनेत फूट पडल्याने भाजपने या मतदारसंघावर दावा करून बघितला पण, शिंदे यांनी तो फेटाळल्याने भाजपने शिंदे गटाला काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवार ( राजू पारवे) दिला आहे. शिंदे गटाची उमेदवारी मिळेपर्यंत पारवे काँग्रेसनिष्ठ होते. त्यामुळे काँग्रेसवर टोकाची कठोर टीका करणाऱ्या मोदींना काँग्रेसमधून आयात केलेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे, ही बाब अनेकांना खटकणारी ठरली आहे.
बालेकिल्ला राखण्यासाठी धावपळ
पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला असून पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या पाच पैकी तीन ठिकाणी भाजपचे व एका ठिकाणी मित्र पक्षाचे विद्यमान खासदार आहेत. २०१९ ते २०२४ या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सत्तेसाठी पक्ष फोडणे, मराठा आणि ओबीसींमध्ये वाद पेटवणे, बेरोजगारी, निष्क्रिय खासदार , ॲन्टिइन्कम्बन्सी, वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे केंद्रातील सरकार विरोधात प्रचंड संताप लोकांच्या मनात आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह विदर्भातील सर्व जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे फक्त ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात तर दहा जागा असलेल्या विदर्भात दोन टप्प्यात मतदान आहे. सर्वच जागांवर प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून केलेली ही आखणी करण्यात आली असल्याची टीका विरोधी पक्षकाडून केली जात आहे.
हेही वाचा : “जो मै बोलता हूँ, वो मै..”, जाहीर सभेत अशोक चव्हाणांचा ‘रावडी’ अंदाज
शिंदे गटात अस्वस्थता
रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तेथील विद्यमान खासदार कृपाल तुमाने सलग दोन वेळा येथून निवडून आले. पक्ष फुटला तेव्हा ते शिंदे गटासोबत गेले. तिसऱ्यांदाही त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा तुमाने यांना होती, पण भाजपच्या आग्रहामुळे शिंदे यांनी तुमाने यांना उमेदवारी नाकारली. मात्र सेनेतीलच इतरांना न देता काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तुमाने समर्थक नाराज आहेत, अशीच परिस्थिती वाशीम-यवतमाळ मतदारसंघात आहे.याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी नागपुरात येऊन तुमानेंना उमेदवारी नाकारल्यावरून फुटीर गटाला लक्ष्य केले.
‘ रामटेक लोकसभा मतदारसंघात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा फक्त त्या मतदारसंघासाठी नसून नागपूर व पूर्व विदर्भातील अन्य मतदारसंघ मिळून आहे. मोदींनी गावांना शहरासोबत जोडले, त्यांचा विकास केला. त्यामुळे सभास्थळ महत्वाचे नाही. पंतप्रधानांच्या सभेचा फायदा पूर्व विदर्भातील सर्व मतदारसंघांना होणार आहे..”
चंदन गोस्वामी , प्रवक्ते, भाजप