Who Will PM Modi Successor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. २०१४ नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. सध्या त्यांच्या नागपूर दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ठरवला जाईल. या मुद्द्यावर आता जोरदार चर्चा सुरू आहे.

मोदी भाजपाचे लोकप्रिय नेते

अलीकडच्या काही वर्षांत भाजपाने लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका जिंकून आपली राजकीय पकड मजबूत केली आहे. तसं पाहता, गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. मात्र, तरीही मित्रपक्षाच्या मदतीनं भाजपानं केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर तीनवेळा पंतप्रधानपद होण्याचा मान मोदींना मिळाला.

मोदीच निवडणुकांचा चेहरा

लोकसभेनंतर तेलंगणा, झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यातील तीन राज्यांमध्ये भाजपाने अभूतपूर्व यश मिळवत स्वबळावर सत्ता स्थापन केली. भाजपाकडून नेहमीच पंतप्रधान मोदींच्या नावावर निवडणुका लढविल्या जातात. सध्या पंतप्रधान मोदी हेच देशभरात भाजपाचा सर्वात लोकप्रिय चेहरा आहेत. या सगळ्यामध्ये मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा अनेकदा होते. सध्या हाच विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

आणखी वाचा : PM Modi RSS Visit : मोदींची संघ मुख्यालयाला भेट, तोंडभरुन कौतुक; यामुळे कुठले मुद्दे आले चर्चेत?

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (३१ मार्च) मुंबईत माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकीय वारसदार कोण असतील? असा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला. यावर उत्तर देताना, “यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्णय घेईल असं दिसतंय. म्हणूनच मोदींना संघाने नागपुरात बोलावलं आणि त्यांच्याशी चर्चा केली”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मोदींचा उत्तराधिकारी निवडताना मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळेल? असा प्रश्नही पत्रकारांनी राऊतांना विचारला. त्यावर ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा ही बंद दाराआड असते. ती शक्यतो बाहेर येत नाही. तरीही त्यातून काही संकेत मिळतात आणि ते संकेत स्पष्ट आहेत. मोदींचा राजकीय वारसदार संघ ठरवेल आणि तो नेता महाराष्ट्रातील असेल”, असा दावाही राऊतांनी केला.

राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यानंतर मोदींचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रातील कोणता नेता असेल, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. याबाबत माध्यमांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची कुठलीही गरज नाही. ते अजून बरिच वर्षे काम करू शकतात. २०२९ मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असताना त्यांचा वारसदार शोधणे, ही आमच्या देशाची परंपरा नाही. ही मुघली संस्कृती आहे आणि तसाही उत्तराधिकारी याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया काय?

पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल यावर पत्रकारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, “उत्तराधिकाऱ्याचा सध्या प्रश्नच कुठे आहे. संघात जी परंपरा आहे, त्यानुसार होईल. तो निर्णय आरएसएस घेईल”, असं भय्याजी जोशी यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची उत्तराधिकारी म्हणून चर्चा होत आहे, असा मुद्दा पत्रकारांनी त्यांच्यासमोर मांडला. त्यावर बोलताना याबद्दल मला काही कल्पना नाही, असं जोशी यांनी स्पष्ट केलं. मोदी आणि संघामध्ये दुरावा वगैरे काही नाही. आम्ही हे मानत नाही, असंही ते म्हणाले.

भाजपाचे नेते राजकीय निवृत्ती कधी घेतात?

भाजपामधील नेते ७५ वर्षांचे झाल्यानंतर ते स्वेच्छेने राजकारणातून निवृत्त होतात, असं म्हटलं जातं. वयाची ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फर्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षांपूर्वी काढले होते. पंतप्रधान मोदी हे आता ७४ वर्षांचे आहेत. १७ सप्टेंबर २०२५ रोजी ते ७५ वर्षांचे होतील. तर २०२९ पर्यंत ते ७८ वर्षांचे होणार आहेत. पंतप्रधान मोदी या वर्षी निवृत्त होतील की, नाही याबद्दल सध्या अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपा २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा नवा चेहरा शोधणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Sujata Karthikeyan : भाजपाची सत्ता येताच दिला राजीनामा; स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणाऱ्या IAS अधिकारी सुजाता कार्तिकेयन कोण?

मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कुणाला पसंती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल, यावर फेब्रुवारी २०२५ मध्ये इंडिया टुडेने मूड ऑफ द नेशन (MOTN) सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात भाजपातील लोकप्रिय नेत्यांची नावं घेण्यात आली होती. सर्वेक्षणानुसार, मोदींचा उत्तराधिकारी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावात खूप स्पर्धा होती. सर्वेक्षणात २६.८% लोकांनी अमित शाह हेच भारताचे पुढचे पंतप्रधान असावेत असं मत व्यक्त केलं. तर २५.३% लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दिली. याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १४.६% लोकांनी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ५.५% लोकांनी आणि शिवराज सिंह चौहान यांना ३.२% लोकांनी पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी म्हणून पसंती दिली होती.

मोदी-संघाच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली?

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अतूट नाते आहे. संघाच्या मुशीतून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपमधून राजकारणात सक्रिय झाले. आजही भाजपाचा संघटन मंत्री हा संघाकडून दिला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वर्षे संघ प्रचारक होते. परंतु, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या भेटीपासून दूर राहणे पसंत केले होते. रविवारी (३० मार्च) ११ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाशी संबंधित सूत्रांचा दावा आहे की, पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.