मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात लावून धरली आहे. मात्र अद्याप पंतप्रधानांनी यावर भूमिका जाहीर केलेली नाही. त्यातच त्यांनी मंगळवारी (दि. २५ जुलै) विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीपासून ते इंडियन मुजाहिद्दीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) अशा दहशतवादी संघटनांपर्यंत अनेकांनी आपल्या नावात ‘इंडिया’ हा शब्द ठेवला आहे. मोदी यांनी पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशनादरम्यान खासदारांची बैठक घेतली. केंद्र सरकारमध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाने तयार राहावे आणि त्या अनुषंगाने तयारी सुरू करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत म्हणाले, विरोधकांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी ‘इंडिया’ हे नाव धारण केले आहे. ‘इंडिया’ हे नाव वगळता बाकी त्या आघाडीत काहीही नाही. तसेच ‘इंडिया’ या नावावरून मोदी यांनी त्याचा संदर्भ ईस्ट इंडिया कंपनी आणि दहशतवादी संघटनांशी लावला. बैठकीला उपस्थित असणाऱ्या एका खासदारांनी द इंडियन एक्सप्रेसला मोदी काय म्हणाले? याची माहिती दिली. पंतप्रधान म्हणाले, “इंडिया कंपनी, इंडियन नॅशनल काँग्रेस, इंडियन मुजाहिद्दीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या सर्व नावामध्येही ‘इंडिया’ आलेले आहे”

हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

पंतप्रधान मोदी खासदारांच्या बैठकीत सांगितले की, विरोधकांच्या नेत्यांना कळले आहे की, पुढच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना विरोधात बसावे लागणार आहे, त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. “मी यापूर्वी कधीही असे दिशाहीन विरोधक पाहिलेले नाहीत. भाजपाच्या खासदारांनी विरोधकांच्या आंदोलनामुळे निराश किंवा विचलित होऊ नये. विरोधकांचे कामच विरोध करणे आहे. यापेक्षा सरकारच्या योजनांचे लाभ सर्वदूर पोहोचत आहे की नाही, यावर लक्ष ठेवावे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत मणिपूरबाबत कोणताही उल्लेख केला नाही.

खासदारांना संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण करून दिली की, जगभरातील मोठे देश भारतातील विद्यमान नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. त्यासाठीच अमेरिका आणि फ्रान्ससारख्या देशांनी आपल्यासोबत करार केले. सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हा जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल, असे काम आपल्याला करायचे आहे, असे पंतप्रधान म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी भारत आणि इंडिया यातील फरक स्पष्ट करून सांगितला. दहशतवादी आणि नक्षलवादी संघटना आपल्या नावापुढे इंडिया हे नाव लावतात, ही आता फॅशनच झाली आहे. विरोधकांनी सुद्धा इंडिया या नावाचा आधार घेऊन परकीय शक्तींच्या सहाय्याने भारताला कमकुवत करण्याचे योजिले आहे, असे ट्विट भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केले.

Story img Loader