PM Modi in Maharashtra: हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाचे पुढचे लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा निवडणुका असेल. शनिवारी (दि. ५ ऑक्टोबर) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ दिवसांत सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांचे विदर्भ आणि मुंबई-ठाण्यात महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यातील कार्यक्रमांचे निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्व काय? याबाबत द इंडियन एक्सप्रेसने एक लेख प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये भाजपाकडून बंजारा समाजापर्यंत पोहोचण्याचा विशेष प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी २० सप्टेंबर रोजीच महाराष्ट्राचा दौरा केला होता. याही दौऱ्यात ते विविध विकासकामांच्या प्रकल्पाचे भूमीपूजन केले जाणार आहे. तसेच बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील जगदंबा माता मंदिर, पोहरादेवी येथेही ते भेट देणार आहेत. तसेच स्थानिक संतांची भेट घेऊन बंजारा विरासत स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हे वाचा >> Video: मोदींचा दौरा; बंदोबस्तातील पोलिसांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल, चित्रफित व्हायरल

बंजारा समाजाच्या मतांवर विशेष लक्ष

भटके विमुक्त प्रवर्गात मोडणाऱ्या बंजारा समाजाची विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात बऱ्यापैकी लोकसंख्या आहे. दलित आणि कुणबी समाजाचा पाठिंबा काहीसा कमी झाल्यामुळे भाजपा आता बंजारा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान बदलाचा प्रचार करून दलित समाजाला स्वतःकडे वळविले. तसेच मराठा आरक्षणामुळे महायुती सरकारवर मराठा-कुणबी वर्ग नाराज आहे.

निवडणुकीच्या यशासाठी दुहेरी रणनीती

एका बाजूला विकासाचा मुद्दा आणि दुसऱ्या बाजूला छोट्या जाती आणि समाजांच्या मदतीने निवडणुकीत यश मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसतो. विदर्भात विधानसभेच्या २८८ जागांपैकी ६२ जागा मोडतात. २०१४ साली भाजपाने विदर्भात ४४ जागा जिंकून मोठी आघाडी घेतली होती. मात्र २०१९ साली भाजपाला इथे केवळ २९ जागा जिंकता आल्या. ज्यामुळे बहुमतापासूनही ते दूर राहिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्रातील बैठकांचे सत्र विदर्भापासूनच सुरू केले होते.

हे ही वाचा >> महायुतीचा बंजारा समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा, मोदींची पोहरादेवीत सभा

विदर्भ विजयासाठी मध्यप्रदेशची मदत

विदर्भात विजय मिळवता यावा म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह काम केलेल्या एका पथकाला विदर्भात पाचारण करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पथकाकडून विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. समाजातील विविध घटकांपर्यंत कसे पोहोचता येईल, याबद्दलचा स्वतःचा अनुभव हे पथक स्थानिक नेत्यांना देणार आहे. तसेच लाडली बहन योजनेचा प्रचार मध्य प्रदेशमध्ये कसा केला गेला, याचीही माहिती पथकाकडून दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विदर्भात २३,३०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी निगडित प्रकल्प आहेत. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ताही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वितरीत केला जाणार आहे. ९.४ कोटी शेतकऱ्यांना सुमारे २०,००० कोटी यानिमित्ताने वितरीत केले जाणार आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ताही वितरीत केला जाणार आहे. यासाठी २,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा >> मंत्रिमंडळाच्या अजेंड्यावर गाय आणि फडणवीसांच्या तोंडी लव्ह जिहाद, व्होट जिहाद हे मुद्दे आताच का?

मुंबई-ठाण्यावरही लक्ष

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई-ठाण्याचाही दौरा करत आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ आणि ठाण्यात २४ अशा एकूण ६० जागा आहेत. २०१४-१९ या काळात भाजपा सरकार असताना विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची जाहिरात करून दोन्ही शहरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाईल.