PM Modi’s visit to RSS headquarters : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० मार्च) नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतलं. पंतप्रधानांच्या हस्ते संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीची पायाभरणी करण्यात आली. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींनी अनेकदा नागपूरचा दौरा केला होता. मात्र, त्यांचा ताफा कधीही संघाचे मुख्यालय व रेशीमबाग स्मृतीस्थळाकडे वळाला नाही. २०१४ नंतर संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची मोदींची ही पहिलीच वेळ होती. या भेटीत पंतप्रधानांनी संघ परिवाराचं तोंडभरून कौतुक केलं.

पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक

गेल्यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि संघात काहीसा दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. हाच दुरावा दूर करण्यासाठी मोदींनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याचं सांगितलं जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. “संघ परिवार हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाचा महाकाय वटवृक्ष आहे, तर कोट्यवधी स्वयंसेवक त्याच्या खोडासारखे आणि फांद्यासारखे आहेत. संघ हा देशहितासाठी बाह्य व आंतरिक दृष्टी चेतना जागृत करणारा यज्ञ आहे”, अशा शब्दात मोदींनी संघाचं कौतुक केलं.

“कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबित असतं. आपल्यावर परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरी भारतीय संकृतीची चेतना कधी मिटली नाही. ही चेतना जागृत ठेवणारी अनेक आंदोलने भारतात होत राहिली आहेत. शंभर वर्षांअगोदर राष्ट्रीय चेतनेच्या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे”, असंही पंतप्रधान म्हणाले.

आणखी वाचा : Sujata Karthikeyan : भाजपाची सत्ता येताच दिला राजीनामा; स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणाऱ्या IAS अधिकारी सुजाता कार्तिकेयन कोण?

मोदींच्या नागपूर दौऱ्यामुळे कुठले मुद्दे आले चर्चेत?

दरम्यान, पंतप्रधानांनी रेशीमबागेत जाऊन संघाचे पहिले दोन सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्याने अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे, कारण यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी या स्मृतीमंदिराला भेट दिलेली नव्हती. मोदींच्या या भेटीकडं भाजपा आणि संघातील दुरावा कमी करणं आणि संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भाजपाचा वैचारिक मार्गदर्शक आहे. भाजपाचे अनेक नेते संघाच्या मुशीतून घडलेले आहेत. मात्र, असं असलं तरी पक्षाचे वरिष्ठ नेते संघाच्या कार्याबद्दल सार्वजनिक मंचावर उघडपणे बोलताना दिसून येत नाहीत. अगदी भाजपाच्या माजी पंतप्रधानांनीही सरकार आणि संघ यांच्यातील फरक बोलून दाखवलेला होता. संघ परिवार कधीही प्रशासन आणि राजकीय अजेंड्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत नाही, असं संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

भाजपा आणि संघात दुरावा?

“भाजपाला निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही”, असे विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीआधी केले होते. त्यांच्या विधानानंतर भाजपा आणि संघ परिवारात दुफळी निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याचा परिणाम थेट निवडणुकीच्या निकालावर झाल्याचं दिसून आलं. भाजपाला दशकात पहिल्यांदाच स्वबळावर बहुतमाचा आकडा गाठता आला नाही. लोकसभेत मर्यादित यश मिळाल्यानंतर भाजपाने लगेचच संघाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.

भाजपाच्या विजयात संघाचे योगदान

यानंतर हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकहाती विजय मिळाला. भाजपाच्या या अभूतपूर्व विजयामागे संघ परिवाराचा मोठा वाटा होता, असं राजकीय विश्लेषक सांगतात. आगामी काळात बिहारसह अन्य राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही एकहाती विजय मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. यासाठी पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पाठबळ मिळणं गरजेचं आहे, म्हणूनच पंतप्रधानांनी ११ वर्षांत पहिल्यांदाच संघाच्या मुख्यालयाला भेट दिली, असं भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं आहे.

‘भाजपा-संघात मतभेद नाहीच’

दरम्यान, संघाचे ज्येष्ठ नेते शेषाद्री चारी यांनी भाजपा आणि संघातील मतभेदांच्या सर्व अटकळी फेटाळून लावल्या आहेत. भाजपा आणि संघाला न समजणाऱ्या लोकांकडून अशा अफवा पेरल्या जात आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे, भाजपामधील निवडणूक व्यवस्थापकांनी कबूल केले की, व्यक्तिमत्त्वावर आधारित राजकारण करण्यावर संघाला तीव्र आक्षेप आहे, कारण भाजपानं २०१४ नंतरच्या सर्व निवडणुका मोदींच्या नावावर लढवल्या आहेत.

सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याआधी नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. परंतु, पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी संघाचे कार्यक्रम किंवा संघ मुख्यालयापासून दुरावा ठेवला होता. रविवारी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबरोबर मोदी एकाच व्यासपीठावर दिसून आले. यापूर्वी, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये राम मंदिराच्या अभिषेकादरम्यान दोन्ही नेते अयोध्येत एकाच व्यासपीठावर आले होते. दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठीमुळे भाजपा आणि संघातील मतभेद कमी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव आणि बेंगळुरूमध्ये भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांपूर्वी पंतप्रधानांचा नागपूर दौरा दोन्ही संघटनांमधील निर्माण झालेला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. पुढील महिन्यात भाजपाची बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेक संघाने भाजपाला राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी काही नावे सुचवली आहेत, त्यामुळे या नावांचा विचार केला जाईल का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : Empuraan Conflict : ‘एम्पुरान’वरून रणकंदन, हिंदूंचा अपमान केल्याचा RSS चा दावा; निर्माते स्वत:हून चित्रपटात करणार बदल!

संघावर छुपा अजेंडा राबविण्याचा आरोप

“आरएसएस हा आमचा वैचारिक गुरु आहे. आज पंतप्रधान मोदींनी राष्ट्र उभारणी आणि देशाच्या विकासात संघाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे,” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संघाशी संलग्न अनेक संघटना देशभरात सामाजिक कार्यासाठी काम करतात, तरी विरोधकांकडून त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. अनेकदा त्यांच्यावर स्वतःचा छुपा अजेंडा राबवण्याचा आरोप केला जातो, असं भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं आहे. राम मंदिराची उभारणी आणि कलम ३७० हटवण्याच्या निर्णयामुळे अनेकदा भाजपावर मुस्लीमविरोधी पक्ष असल्याची टीका झाली आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींकडून स्वयंसेवकांचं कौतुक

दरम्यान, प्रयागराजमधील नुकत्याच झालेल्या महाकुंभमेळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महत्त्वाच्या भूमिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले होते, त्यामुळे भाजपाच्या राजकारणात संघाचे काही मुख्य अजेंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आल्याचं काहींचं म्हणणं आहे. त्यातच केंद्र सरकारने संघाने आयोजित केलेल्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यावरील बंदी उठवली आहे, त्यामुळे संघ आणि भाजपा यांच्यात निर्माण झालेला दुरावा कमी झाल्याचं सांगितलं जात आहे.