मोहन अटाळकर
अमरावती : आमदार बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद आणि मंत्रिपदाचा दर्जा देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारने केला खरा, पण अद्यापही बच्चू कडू समाधानी नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कोणत्याही आघाडीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे सांगून त्यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. मतदार संघातील प्रस्थापित विरोधी भावना दूर करण्याची आणि स्वत:च्या प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्ताराची त्यांची महत्वाकांक्षा प्रकर्षाने समोर आली आहे.
राज्यात २०१९ च्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षाच्या वेळी स्वतंत्रपणे निवडून आलेल्या आमदारांच्या भूमिकेला महत्व आले होते. अशा अटीतटीच्या वेळी आमदार बच्चू कडू यांनी आपले वजन उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात टाकले होते. सत्ता स्थापन होण्याआधीच ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन बच्चू कडूंनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरेंविरोधातील बंडात ते सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण बच्चू कडूंना मंत्रिपद मिळू शकले नाही. त्याविषयी ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत राहिले, अखेरीस मंत्रिपदावरील दावा आपण सोडत असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्याचे समाधान आहे, असे ते सांगतात.
हेही वाचा… मीरा -भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांची मोर्चेबांधणी, भाजपमध्ये अस्वस्थता
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन आमदार आहेत. निवडणुकीच्या वेळी महायुतीत या पक्षाची दखलपात्र स्थिती रहावी, यासाठी त्यांनी आत्तापासून प्रयत्न सुरू केले आहेत. ते शिंदे गटातील आमदार आहेत. शिंदे गटाला दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येत असताना बच्चू कडू यांना भाजपसमोर आपल्या पक्षाचे मूल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा सूर आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने शब्द न पाळल्यास मनोज जरांगेंसोबत आंदोलन करणार असा इशारा त्यांनी काही दिवसांपुर्वी दिला होता. सरकारने मला दिव्यांग मंत्रालय खाते दिले. मात्र, हे खाते केवळ नावापुरतेच शिल्लक आहे. ना कुठली गाडी, ना घोडी, ना कोणतेही अधिकार. मात्र समाधान याचे आहे, की मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो, अशा शब्दात ते अनेक ठिकाणी खंत व्यक्त करताना दिसतात.
सत्तेत असूनही सरकारच्या विरोधात थेट वक्तव्य केल्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार का, अशी चर्चा साहजिकपणे सुरू झाली. या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बच्चू कडूंनी पवारांना आपल्या घरी चहापानासाठी आमंत्रित केले. त्यानंतर ते महाविकास आघाडीत परत जाणार का, अशी चर्चा रंगली. पवारांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता फेटाळून लावली. पण, जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महायुतीतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही. ते मुख्यमंत्री नसतील, तेव्हा विचार करू, असा सूचक इशारा कडूंनी दिला. चर्चेतल्या सर्व गोष्टी उघड करायच्या नसतात, असे सांगून अनिश्चितता कायम ठेवली. एकीकडे, स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व दर्शविण्याच्या प्रयत्नात आपण शिंदे गटातील इतर आमदारांसारखे नाही, हा संदेश त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना द्यायचा आहे. त्याचवेळी, महाविकास आघाडीचे दार देखील आपल्यासाठी खुले असल्याचे सांगायचे आहे.
हेही वाचा… जालन्यात शरद पवार की अजित पवार कोणत्या गटाचे वर्चस्व ?
बच्चू कडू यांचा पारंपारिक अचलपूर मतदारसंघ हा शेतकरी बहुल, विविध जाती-धर्माच्या मतदारांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा कितपत प्रभावी ठरणार, याची उत्सुकता आहे. त्यांची स्पर्धा ही भाजप आणि कॉंग्रेससोबत राहणार आहे. सत्तारूढ आघाडीत त्यांचा भाजपशी छुपा संघर्ष आहे. विरोधी आघाडीतील कॉंग्रेसचा सामना कशा पद्धतीने करता येईल, याची व्यूहनीती त्यांना आखावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रहार पक्षाची दखल महायुतीने घ्यावी, यासाठी ते तीन ते चार जागांची मागणी करताना दिसत आहेत. बच्चू कडू हे दिव्यांगांचे प्रश्न हाती घेऊन राज्यभर दौरा करताना दिसतात. या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. पण, आता त्यांना स्वत:च्या मतदारसंघावर देखील लक्ष केंद्रित करावे लागत आहे. बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा सुरू असल्याने त्यांनी बचावात्मक प्रवित्रा सोडून आक्रमक फलंदाजी सुरू केली आहे. भाजपकडून कोणती ‘गुगली’ टाकली जाते आणि त्यांना महायुतीतून कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.