अविनाश कवठेकर, राहुल खळदकर
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा त्याच्याच जवळच्या दोन साथीदारांनी पुण्यात गोळ्या झाडून केलेला खून, त्यानंतर मोहोळ याच्या पत्नीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट तसेच भाजप आमदार नितेश राणे यांनी मोहोळ याच्या घरी दिलेली भेट, या पार्श्वभूमीवर राजकारण आणि राजकारणातील गुंडगिरी या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. संघटित गुन्हेगारी जगताशी निगडीत अनेक गुंड भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.
शहर आणि देशाच्या राजकारणात ‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेल्या पुण्यातील एका नेत्याच्या कारकिर्दीत गुंडांचा राजकारणात शिरकाव झाला. त्यानंतर महापालिका निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक, गुंडांचे किंवा त्यांच्या कुटुंबीयांचे पक्षप्रवेश कायम चर्चेत राहिले. सत्ताबदलानंतर टोळ्यांना आणि टोळी प्रमुखांना मिळणारी सामाजिक सुरक्षितता लक्षात घेऊनच ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षात प्रवेश करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले असून संघटित गुन्ह्याचे आरोप असलेल्या व्यक्तींची राजकीय गरज लक्षात घेऊन त्यांना पक्ष प्रवेश दिला जात असल्याचेही दिसून येत आहे.
हेही वाचा…. मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्ह्यात हिंदुत्वाचा नारा, हाजी मलंग की श्रीमलंगच्या वादाला पुन्हा फोडणी
कुख्यात गुंड बाबा बोडके याची पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात दहशत होती. गेल्या काही वर्षांपर्यंत गुन्हेगारीपासून फारकत घेऊन राजकीय कारकीर्द घडवण्याचा प्रयत्न बोडके याच्याकडून सुरू होता. सध्या तो गुन्हेगारीशी संबंधित नाही आणि पोलीस रेकॅर्डवर त्याची टोळी असल्याचे उल्लेख नाही. तसेच गुन्ह्यातूनही तो निर्दोष सुटला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत बोडकेने भोरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. शिवसेनेकडून त्याला उमेदवारी मिळण्याचे जवळपास निश्चित देखील झाले होते. त्या वेळी बोडके थेट ‘मातोश्री’वर गेला होता. मात्र, ऐन वेळी बोडकेचे तिकीट कापले गेले. तेथून कुलदीप कोंडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. प्रस्थापित आमदार संग्राम थोपटे यांना शह देण्यासाठी बोडके याने गेली काही वर्ष सातत्याने प्रयत्न केले होते. दरम्यान, बोडके याने सन २०१६ मध्ये भाजप-सेना युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे छायाचित्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यावरून भाजपवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुढे आल्यानंतर भाजप नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांंना त्याबाबत सारवासारव करावी लागली होती. विशेष म्हणजे या भेटीपूर्वी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकार सत्तेत असताना बोडके याने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर सभेत प्रवेश केला होता. त्या वेळी प्रसारमाध्यमांनी बोडकेच्या पक्षप्रवेशावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर तातडीने बोडके याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली होती.
शहरातील दुसरा कुख्यात गुंड गजानन मारणे हा देखील निवडणूक लढविण्यास इच्छुक होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर त्याची पत्नी जयश्री यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत त्या कोथरूडमधून विजयी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी तत्कालीन पालकमंत्री, विद्यमान तंत्र आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
हेही वाचा… कोल्हापूतील बड्या नेत्यांना लोकसभेपेक्षा विधानसभाच अधिक प्रिय
संघटित गुन्हेगारीत सक्रिय सहभाग असलेला दिनेश उर्फ पिंटू धावडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्याची पत्नी रुपाली त्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. शेलार याचा पक्ष प्रवेशावरून शहराच्या राजकारणात खडबळ उडाली होती. तत्कालीन पालकमंत्री, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्येच रंगली होती. त्यानंतर बापट यांना त्याबाबत जाहीर माफी मागावी लागली होती.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावरील खुनी हल्ल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी मोहोळ कुटुंबीयांची भेट घेतली. नितेश राणे यांनी तर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा दिला. शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांनी भाजप शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थनासाठी भाजप नेते पुढे येत आहेत. स्वाती यांनी गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातून राजकारण्यांनाही संघटित गुन्हेगारीचे आरोप असेल्या व्यक्तींची गरज असल्याचेही दिसून येत आहे.