कोल्हापूर: काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाचे पाणी आणण्याचे कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार झाल्यानंतर या पाण्यासमवेत राजकीय श्रेयवादाचा प्रवाह वाहू लागला आहे. नवे पाणी कोल्हापुरात येताचक्षणी यासाठी आमदार सतेज पाटील यांनी जलपूजन करून बाजी मारली. त्यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजीचा सूर लावला. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे म्हणत बोट सतेज पाटील यांच्या दिशेने नेले. तर काल पाणी योजनेचे शिल्पकार असे म्हणत सर्वपक्षीय गौरव समितीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांचा नागरी सत्कार केला. त्याला शह देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पुढील महिन्यात या योजनेचे दणक्यात लोकार्पण करण्याचे नियोजन महायुतीने केले आहे.

कोल्हापूर शहराला अपुरा, अनियमित, अस्वच्छ पाणीपुरवठा होत होता. कोल्हापूरकरांची तहान भागवण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी योजना राबवण्याचे ठरले. तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्या प्रयत्नामुळे भरीव आर्थिक निधी मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा हिस्सा देण्याची तत्परता दाखवली. या दोघांच्या उपस्थितीमध्ये तत्कालीन महापालिकेचे नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ या मंत्र्यांनी भूमिपूजन केले. यानंतर राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर योजनेचे काम होत राहिले. तांत्रिक दोष उद्भवत राहिले. परवाना मिळण्याचे मुद्दे लटकत राहिले.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana
लक्षवेधी लढत : रवी राणा यांच्याविरोधात सारे एकवटले
Mallikarjun kharge nashik rally
“महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Jayant Patil criticizes Mahayuti, corruption, Jayant Patil,
पिंपरी : भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे; जयंत पाटील यांचे विधान

स्वप्न सत्यात उतरले

पाटील- मुश्रीफ हे पुन्हा मंत्री झाल्यानंतर कामाला गती आली. मात्र ४५० कोटी खर्चाचे हे भव्यतम काम नेमके कधी पूर्ण होणार याची काहीच शाश्वती देता येत नव्हती. हसन मुश्रीफ हे तर दिवाळीच्या पाण्याने अभंगस्नान असे वरचेवर सांगत राहिले. याही वर्षी त्यांनी ही घोषणा करीत यंदा नक्कीच आंघोळ होणार असे आश्वस्त केले होते. इकडे, घोषणा करण्यापेक्षा काम गतीने पूर्ण करणे गरजेचे आहे असे म्हणत सतेज पाटील यांनी शेवटच्या टप्प्यातील कामावर घारीसारखी नजर ठेवली. पाणी कोल्हापुरात येणार याचा सुगावा लागतात आत्यंतिक चपळाई आणि तितक्याच गोपनीयपणे रातोरात सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव या काँग्रेसच्या आमदारांनी जलपूजन केले. फटाक्याची आतषबाजी, वाद्यांचा निनाद, गुलालाची उधळण करीत जल्लोष करून योजना आपल्यामुळे मार्गी लागली हे शहरवासियांत बिंबवण्यात सतेजनीती यशस्वी ठरली.

दिवाळीत श्रेयवादाचे फटाके

पण त्यावरून ऐन दिवाळीत कोल्हापुरात श्रेयवादाचे भुईनळे उडू लागले. विरोधकांनी सतेज पाटील यांच्या या पद्धतीवर नाके मुरडली. शिंदे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी काळम्मावाडी पाणी योजनेमध्ये काँग्रेसच्या एका आमदाराने ७० कोटी रुपयांचा ढपला पाडला (गैरव्यवहार) आहे, असा खळबळजनक आरोप करून याची ईडी कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी नाव घेतले नसले तरी सतेज पाटील यांच्या दिशेने त्यांचा बाण होता हे लपून राहिले नाही. या पाणी योजनेसाठी पाठपुरावा करणारे दुसरे नेते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही सतेज पाटील यांच्या घाईघाईने श्रेय घेण्याच्या प्रयत्नावर नाराजी व्यक्त केली. रातोरात जाऊन जल पूजन करण्याची आवश्यकता नव्हती. हा काही चोरीचा मामला नव्हता. या योजनेचे श्रेय कोण्या एकट्याचे नाही तर जनतेचे आहे, असा टोला मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना लगावला. याचवेळी मुश्रीफ यांनी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळून लावत आवश्यक तर चौकशी केली जाईल, असे म्हणत पाटील – क्षीरसागर या दोघांची मर्जी राखण्याचे कौशल्य दाखवले.

शह – काटशहाचे राजकारण

दिवाळी सरल्यानंतरही हा वाद काही थांबताना दिसत नाही. मंगळवारी या योजनेसाठी पाठपुरावा केल्याच्या निमित्ताने सतेज पाटील यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचा घाट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत घातला होता. त्यांनीही सतेज पाटील यांच्यामुळे कोल्हापूरचा पाणी प्रश्न मिटल्याचा निर्वाळा देत श्रेय त्यांच्या खात्यावर टाकले. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अल्पकाळासाठी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि महायुतीच्या वतीने काळम्मावाडी योजनेचा वाजत गाजत लोकार्पण सोहळा ४ डिसेंबरला करणार असल्याचे सांगण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून याची नियोजन सुरू असताना योजनेच्या श्रेय नामावलीतून सतेज पाटील यांना वगळण्याच्या हालचालीची किनार लागली आहे. काळम्मावाडी सारखी स्वप्नवत, महत्वाकांक्षी पाणी योजना पूर्ण होत असताना सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या करवीर नगरीत वादाचा प्रवाह आणखी गतिमान झाला असून पुढे कसा वळण घेतो हे लक्षवेधी ठरले आहे.