नागपूर: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सत्तेची सर्व सुत्रे भाजपच्या हाती होती. तरीही त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे जिल्ह्यात कुरघोडी केल्याचे ऐकिवात नाही. मात्र आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे कुरघोडीची संधी सोडत नाही. त्यासाठी त्यांना कुठलेही निमित्त पुरेसे ठरते. काश्मिरात अडकलेल्या नागपूरकर पर्यटकांशी संपर्क साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिल्याची माहिती पर्यटकांकडूनच बाहेर आली. नागपूरकर पर्यटकांच्या मदतीला ठाणेकर शिंदे धावले या एका ओळीतूनच शिंदे यांनी दिलेला संदेश नागपूरमध्ये चर्चेचा विषय आहे.

काश्मिरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सर्वाधिक जायबंदी झाला आहे. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, जळगाव येथील पर्यटकांचा त्यात मृत्यू झाला. नागपूरच्या रुपचंदानी कुटुंबाचा जीव थोडक्यात बचावला, नागपूरसह महाराष्ट्रातील हजारो पर्यटक काश्मीरमध्ये अडकले. ही घटना घडल्यानंतर महराष्ट्र शासन तातडीने कामाला लागले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या रुपचंदानी कुटुंबीयांशी संपर्क साधला, मदतीचे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी तेथे अडकलेल्या पर्यटकांना त्यांच्या मुळ गावी परतण्यासाठी व्यवस्थेचे नियोजन केले, तेथे विशेष विमाने पाठवली जाणार आहेत.

महाराष्ट्राचे मंत्री श्रीनगरला ठाण मांडून बसले आहेत. एकीकडे सरकार म्हणून प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पर्यटकांच्या मदतासाठी समांतर प्रयत्न सुरू केले आहेत. नागपूरहून काश्मीरमध्ये गेलेले व सध्या तेथे अडकलेल्या ४१ पर्यटकांशी शिंदे यांच्या चमूने संपर्क साधला व तेथून नागपूरला जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकार स्वतंत्रपणे पर्यटकांसाठी प्रयत्न करीत असताना शिंदे यांच्या चमूने त्यांना सरकारच्याच्याच व्यवस्थेची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले दिसत नाही. यातूनच शिंदेच्या कुरघोडीचा प्रयत्न दिसून येतो. राज्याचे मुख्यमंत्रपद नागपूरकर व्यक्ती भूषवत असताना तेथील पर्यटकांच्या मदतीला ठाणेकर शिंदे धाऊन जातात हा संदेशच विद्यमान राजकीय परिस्थितीत महत्वाचा आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी २२० पर्यटकांची यादी जाहीर केली. बहुतांश जण श्रीनगरमध्ये थांबले आहे. शिंदे चमू ज्या ४० लोकांच्या समुहाशी संपर्कात आहे ते सर्व यापैकीच आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिंदेची माणसे येऊन गेल्याचे सांगितले. वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही यंत्रणा नागपूरमध्ये सक्षम आहे. अनेक स्वंयसेवी संघटना त्यांच्याशी जुळलेल्या आहेत. असे असताना काश्मीरमध्ये अडकलेल्या नागपूरकर पर्यटकांच्या मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला अजून तरी दिसून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिंदे चमूने घेतलेला पुढाकार जास्त चर्चेत आहे.