छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या ४६ मतदारसंघातील राजकीय पटावर ‘जोडू या अतुट नाती,’ हा प्रयोग पुन्हा एकदा रंगणार आहे. लातूरच्या राजकारणात विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव अमित आणि धीरज सध्या आमदार आहेत. भोकदनमधून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगीतसिंह पाटील, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याबरोबर धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर हे राजकीय विरोधक मैदानात असतीलच. शिवाय भास्करराव खतगावकरांच्या सूनबाई मीनल खतगावकर, शिवराज पाटील यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकुरकर यांच्यासह पुन्हा एकदा नात्यांचा आधार घेत नवा डाव, नवा पक्ष, नवा उमेदवार असा खेळ विधानसभा निवडणुकीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. नात्यांच्या राजकारणात पक्ष दुय्यम असतो हेही सूत्र आता मतदारांनी मान्य केले असल्यासारखे वातावरण आहे.
लातूरच्या राजकारणात अमित देशमुख व धीरज देशमुख यांच्या राजकरणाला पुरक ठरणाऱ्या अनेक बाबी त्यांचे काका दिलीपराव देशमुख करत असतात. वैशालीताई देशमुख यांनी लोकसभेतही प्रचार केला. त्यामुळे डॉ. शिवाजी काळगे यांची उमेदवारी देशमुख कुटुंबियांनी अधिक गांभीर्याने घेतल्याचा संदेश दिला गेला होता. एकाच कुटुंबातील हे दोन आमदार लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदारसंघावर पुन्हा दावा करणार आहेत.
अशीच स्थिती भोकरमध्येही असेल. खासदार अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी अमिता देशमुख यांना एकदा विधानसभेत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. आता ते त्यांची मुलगी श्रीजया यांना भोकर मतदारसंघातून निवडणुकीस उभे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे दौरे सुरू झाले आहेत. ‘जोडू या अतुट नाती’ हे घोषवाक्य बनावे अशी बीड जिल्ह्यातील स्थिती आहे. केशरकाकू क्षीरसागर यांच्यानंतर जयदत्त क्षीरसागर, पुढे राजकीय वादानंतर पुतण्या संदीप क्षीरसागर बीड नगरपालिकेच्या राजकारणात तर क्षीरसागर कुटुंबाचेच वर्चस्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबात फक्त १८ महिने पद नव्हते. अन्यथा सलग कोणी ना कोणी आमदार किंवा खासदार मुंडे यांच्या घरातील असे. कुटुंबात वाद होतात. राजकीय पटलावर ते पराकोटीचे असतात. या वादात कार्यकर्ते आयुष्याभराचे शत्रूत्व घेऊन जगतात. पण आता मुंडे बहीण – भावातील वाद मिटले आहेत. परळी मतदारसंघातून आता धनंजय मुंडे उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. गेवराईमध्ये पंडीत घराण्यांमध्ये काही वर्षे सत्ता होती. दिवंगत नेते बाबुराव आडसकरांचे पूत्र निवडणुकीमध्ये उभे राहतात. विमलताई मुंदडा यांच्या सूनबाई नमिता मुंदडा आमदार आहेत. बहुतांश मतदारसंघात नात्यांचे बंध मतदारांनी अधिक मजबूत केलेले. धाराशिव जिल्ह्यात ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजीसिंह पाटील भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. याच कुटुंबातील राजकीय संघर्षानंतर ओम राजेनिंबाळकर आता शिवसेने ठाकरे गटाचे खासदार आहेत. परभणी जिल्ह्यात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनाही घराणेशाहीचा वारसा आहेच.
नांदेड जिल्ह्यात रावसाहेब अतापूरकर दोन वेळा आमदार होते. त्यांचे पूत्र जितेश अंतापूरकर यांनी नुकताच कॉग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपचे आमदार तुषार राठोड यांच्या मुखेड मतदारसंघात आणि नगरपालिकेत तर भाऊ, वहिनी यांनीही नगराध्यक्ष पद सांभाळले होते. बाबुराव पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव नागेश पाटील आष्टीकरही आता हिंगोलीचे खासदार आहेत. अगदी दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांच्या घरात तर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष होते. जोडू या अतुट नाती हा मंत्र या वेळीही पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये जपला जाण्याची शक्यता अधिक आहे.