सोलापूर : कांदा व्यवहारासाठी संपूर्ण राज्यात अग्रेसर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक विविध नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे गाजत आहे. येत्या २७ एप्रिल रोजी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपमध्ये दोन गट विभागले गेले आहेत. आश्चर्य म्हणजे गेली दहा वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे दोघे आपल्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात एकत्र आले आहेत.
दुसरीकडे काँग्रेस पक्षातही नेते मंडळी विभागली गेली आहेत. या निवडणुकीत कोणाच्या बाजूने मतदार कौल देतील, हा सार्वत्रिक उत्सुकतेचा मुद्दा असताना या निकालानंतर सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१९६२ साली दिवंगत सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी स्थापन केलेली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीसह कांदा व्यवहारासाठी संपूर्ण राज्यासह शेजारच्या कर्नाटक व तेलंगणापर्यंत प्रसिद्ध ठरली आहे. त्यामुळे या बाजार समितीमध्ये निवडून येणारे संचालक मंडळही तेवढेच श्रीमंत मानले जाते.
यापूर्वी बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या कथित गैरकारभाराची चौकशी याच बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सोलापूर दक्षिणमधून विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे तत्कालीन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात होऊन संचालक मंडळावर फौजदारी गुन्हाही दाखल झाला होता. हे प्रकरण नंतर मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. भाजपच्या स्थानिक राजकारणात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि तत्कालीन मंत्री सुभाष देशमुख यांच्यातील गटबाजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती. त्यावेळी बाजार समितीच्या अडचणीत बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांनी सत्ता संरक्षणासाठी विजयकुमार देशमुख यांचा धावा केला होता. परिणामी, बाजार समितीच्या मागील निवडणुकीत दोन्ही देशमुखांनी एकमेकांच्या विरोधात पॅनेल उभे केले होते. यात सुभाष देशमुख हे सहकार व पणन खात्याचे मंत्री असूनही त्यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवून काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांनी बाजार समितीवरील वर्चस्व राखले होते. पुढे तब्बल पाच वर्षे आमदार विजयकुमार देशमुख यांनीच बाजार समितीच्या सभापतिपदाचा कारभार सांभाळला होता.
या पार्श्वभूमीवर गेली दहा वर्षे दोन्ही देशमुखांमध्ये मोठी दरी निर्माण झाली होती. त्यांना आपापसातील मतभेद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचवेळी सज्जड दम दिला होता. परंतु तरीही फरक पडला नव्हता. नंतर चंद्रकांत पाटील यांनीही पालकमंत्री असताना दोघात समेट घडविण्यासाठी प्रयत्न केले. यश आले नव्हते. परिणामी, दोन्ही देशमुखांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचे बळ मिळाले व त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली . मग त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांनाही न जुमानता, उलट सुभाष देशमुख यांनी दूर केलेल्या दोघा हितसंबंधी कार्यकर्त्यांना जवळ केले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार कल्याणशेट्टी यांनी सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, याच पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे आदींशी सलगी करून स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. इकडे आमदार सुभाष देशमुख यांचा तीळपापड होऊन त्यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे पॅनेल निवडणूक रिंगणात आणले आहे.आमदार कल्याणशेट्टी आणि आमदार विजयकुमार देशमुख हे दोघेही वीरशैव लिंगायत समाजाचे. समाजाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत ते एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठीचा मुद्दा पुढे करून आपलेच पक्षांतर्गत विरोधक आमदार सुभाष देशमुख यांच्याशी हातमिळवणी केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दोन्ही देशमुखांच्या विरोधात पंगा घेतल्यामुळे आगामी काळात त्यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात कल्याणशेट्टी अडचणीत येऊ शकतात.
दोन्ही देशमुखांनी कधी नव्हे ते एकत्र येऊन भाजप कार्यकर्त्यांसाठी बाजार समितीची निवडणूक लढविण्याची घेतलेली भूमिका उपयुक्त ठरते की सहकारात वजनदार असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांसमवेत आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेली आघाडी यशस्वी ठरते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत असल्याचा दावा केला असला तरी दोन्ही देशमुखांनी मात्र या संदर्भात वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडवणीस हे नेमके कोणाच्या पाठीशी असणार ? फडणवीस यांचा आशीर्वाद हे खोटे कथानक आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वपक्षातील वरिष्ठांना बाजूला ठेवून ही निवडणूक लढवत असल्यामुळे काँग्रेसच्या गोटातून आश्चर्य व्यक्त होत आहे. यातच अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके व इतरांनी नाराज होऊन दोन्ही देशमुखांना साथ देण्याची भूमिका घेतली आहे.
या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी यांच्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसच्या नेत्यांनी हस्तगत केले असून आमदार कल्याणशेट्टी यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. काँग्रेसशी जुळवून घेताना कल्याणशेट्टी यांनी समसमान जागा मिळविल्या असत्या तर त्यांच्या भूमिकेला भाजपमधूनही समर्थन मिळाले असते. पण कार्यकर्ता विरूद्ध नेता अशा या निवडणुकीत कल्याणशेट्टी यांनी नेत्यांच्या सोबत जाण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या दृष्टीने राजकीय जुगार मानला जातो. दुसरीकडे दोन्ही देशमुखांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्याचे स्पष्ट केले तरी त्यांच्या पॅनेलमध्ये काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही संधी देण्यात आल्याचे दिसून येते. सहकारात वर्चस्व असल्याने सर्वपक्षीय आघाडीचे पारडे जड मानले जाते. त्यांचे हे पॅनेल विजयी ठरल्यास त्याचे श्रेय आमदार कल्याण शेट्टी यांना की काँग्रेसला, हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.